निर्भयाला मिळाला न्याय, चारी आरोपीना दिली गेली फाशी


फोटो सौजन्य जागरण
सात वर्षे, तीन महिने आणि चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर निर्भयाला अखेर न्याय मिळाला आणि निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना तिहार जेल मध्ये आज पहाटे साडेपाच वाजता फाशी दिले गेले. या वेळी तुरुंगाबाहेर प्रचंड संख्येने लोक जमा झाले होते त्यामुळे निमलष्करी दलाचे जवान तैनात केले गेले होते. फाशी दिल्यानंतर काही वेळाने डॉक्टर्स तेथे गेले आणि त्यांनी आरोपी मृत झाल्याचे जाहीर केल्यावर हे मृतदेह दोन अम्ब्युलन्स मधून पोस्टमार्टेम साठी दीनदयाळ उपाध्याय हॉस्पिटल मध्ये पाठविले गेल्याचे समजते.

१६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीत चालत्या बस मध्ये निर्भया आणि तिचा मित्र चढले असताना निर्भयावर सहा जणांनी अमानुष बलात्कार केला आणि तिला व तिच्या मित्राला चालत्या बस मधून खाली ढकलून दिले. त्यात जखमी झालेल्या निर्भयाचा सिंगापूर मध्ये उपचार सुरु असताना मृत्यू झाला होता. सहा पैकी एका आरोपीने २०१३ मध्ये तिहार जेल मध्ये आत्महत्या केली होती तर दुसरा अज्ञान असल्याने त्याला सुधारगृहात पाठविले गेले होते. तीन वर्षानंतर त्याला सोडले गेले होते.

विनयकुमार शर्मा, पवनकुमार गुप्ता, मुकेश सिंग आणि अक्षयकुमार अशी फाशी दिलेल्या आरोपींची नावे आहेत. उत्तर भारताच्या इतिहासात प्रथमच एकाचवेळी चार जणांना फाशी दिले गेले आहे. यापूर्वी पुण्याच्या येरवडा जेल मध्ये जोशी अभ्यंकर हत्याकांडातील चार आरोपींना एकाचवेळी २५ ऑक्टोबर १९८३ रोजी फासावर लटकविण्यात आले होते. ही देशातील एकाचवेळी चौघांना फासावर देण्याची पहिली घटना होती.

निर्भया आरोपीना फाशी देणाऱ्या पवन जल्लादला या फाशीसाठी ६० हजार रुपये देण्यात आल्याचे समजते. फाशीसाठी इतके पैसे देण्याची ही पहिलीच वेळ आहे. पवन जल्लाद याच्या आजोबानी तिहार जेल मध्ये दोन वेळा दोघा जणांना एकाच वेळी फाशी दिली होती. त्यात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे हत्यारे सतवंतसिंग आणि केहर सिंग तसेच गीता चोप्रा खून प्रकरणातील दोषी रंगा बिल्ला यांचा समावेश होता.

आरोपींना फाशी दिल्यावर तुरुंगाबाहेर जमलेल्या लोकांनी घोषणा दिल्या आणि मिठाई वाटल्याचे समजते तर निर्भयाच्या आईने आजचा सूर्य मुलींच्या नावाने उगविला अशी प्रतिक्रिया दिली.
————–

Leave a Comment