इटलीत एकाच दिवसात 475 कोरोनाग्रस्तांचा मृत्यु


चीनपाठोपाठ कोरोना व्हायरसचा सर्वात जास्त फटका इटलीला बसला असून या देशात एकाच दिवसात तब्बल 475 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे कोणत्याही देशात एका दिवसात एवढे मृत्यु झाल्याची जगातील ही पहिली घटना आहे. दुर्दैवाने याआधीही एका दिवसात सर्वात जास्त बळी गेल्याची घटनाही इटलीतच घडली होती. त्यावेळी एका दिवसात 368 जणांचा मृत्यू झाला होता.

चीनच्या पाठोपाठ इटलीत कोरोनाचा सर्वात जास्त कहर झाला आहे. इटली कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंच्या आकडेवारीत चीनच्या जवळ पोहोचला आहे. बुधवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, इटलीत मृत्यूमुखीत पडलेल्यांची संख्या 2978 झाली आहे तर लागण झालेल्यांची संख्या 34173 आहे. यामधील 2257 जणांची प्रकृती गंभीर आहे. इटलीत उपचारानंतर 4205 जणांची प्रकृती सुधारली आहे. दुसरीकडे चीनबद्दल बोलायचे झाल्यास कोरोनाचा प्रभाव कमी होताना दिसत आहे. चीनमध्ये 80 हजार 884 जणांना कोरोनाची लागण झाली असून मृतांचा आकडा 3237 वर पोहोचला आहे.

दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमिवर इटलीत लॉकडाऊन करण्यात आलेले असून लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकमेकांपासून तीन फुटांचे अंतर ठेवण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. शाळा, कॉलेज, महाविद्यालये, रेस्तरॉं, चित्रपटगृहे बंद करण्यात आलेली असून लोकांना घरातच थांबवण्यास सांगण्यात आलेले आहे. इटलीत लाखो लोक आपल्या घरातच थांबलेली आहेत.

Leave a Comment