कोरोना : आखाती देशातून 26 हजार भारतीयांची मुंबईत वापसी


मुंबई – जगभरातील बहुतांश देशांमध्ये कोरोनाचा प्रसार होत असून या पार्श्वभूमीवर आजपासून ३१ मार्च दरम्यान आखाती देशातून २६ हजार भारतीयांची घरवापसी होणार असल्याची माहिती केंद्र सरकारकडून मुंबई महानगरपालिकेला देण्यात आली आहे. कोरोनाचा या नागरिकांद्वारे प्रसार होऊ नये म्हणून त्यांना १४ दिवसांसाठी होम क्वारेंटाइनमध्ये ठेवले जाणार आहे. यासाठी क्रीडाई या बिल्डर असोसिएशनने आपल्या बांधून तयार असलेल्या सर्व इमारती पालिकेच्या ताब्यात देण्याचे मान्य केले असल्याचे पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी सांगितले.

देशाबाहेरून आलेल्या प्रवाशांमुळे कोरोना हा विषाणू पसरत आहे. सध्या प्रवाशांच्या सहवासात असलेल्या लोकांमध्ये हा विषाणू पसरल्याचे दिसत आहे. पुढे स्टेज ३ मध्ये हा विषाणू कोणामध्येही पसरू शकतो. यासाठी परदेशातून आलेल्या प्रवाशांची तपासणी करून त्यांना कोरोनाची लागण झाली असल्यास कस्तुरबामध्ये ठेवले जात आहे. तर, इतरांना सेव्हन हिल किंवा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये १४ दिवस होम क्वारेंटाइन केले जात आहे, असे पालिका आयुक्तांनी सांगितले.

कोरोना सर्व जगभरात पसरत असल्याने आपल्याला पुन्हा भारतात आणण्याची मागणी आखाती देशात असलेल्या भारतीय नागरिकांनी केंद्र सरकारकडे केली आहे. असे सुमारे २६ हजार भारतीय नागरिक पुन्हा आपल्या देशात येणार आहेत. विमानतळावर या नागरिकांची तपासणी करून त्यांना होम क्वारंटाइन करावे लागणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जागेची आवश्यकता लागणार आहे. त्यासाठी ज्या नागरिकांचे मुंबईत घर आहे त्यांना घरी होम क्वारंटाइनमध्ये ठेवले जाणार आहे. तर, इतरांना होम क्वारंटाईन करता यावे म्हणून शहरातील क्रीडाई या बिल्डर असोसिएशनबरोबर बोलणी करण्यात आली आहे. शहरात मोठ्या प्रमाणात इमारती रिक्त आहेत. त्यामध्ये या नागरिकांना होम क्वारंटाइन केले जाईल. या इमारतींमध्ये सीएसआर फंडमधून लागणाऱ्या सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असे आयुक्तांनी सांगितले.

Leave a Comment