पुण्यातील सीरत कमिटीचे मशिदी बंद करण्याचे आवाहन


पुणे : केंद्र तसेच राज्य सरकारने कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी उपाययोजना राबवण्यासोबतच काही कठोर निर्णयही घेतले आहेत. मुंबई, पुण्यासह राज्यभरात कोरोनाच्या भीतीमुळे संचारबंदी सदृश्य स्थिती आहे. कोरोनामुळे राज्यभरातील मंदिरे तसेच धार्मिक स्थळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातच आता पुण्यातील सीरत कमिटीकडून मशिदी बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मौलाना निझामुद्दीन फखरुद्दीन आणि मौलाना अहमद कादरी यांनी शुक्रवारीचा नमाझ घरीच पढण्याबाबत मुस्लिम बांधवांना सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने देशभरासह महाराष्ट्रात थैमान घातले आहे. दिवसागणिक कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात या व्हायरसमुळे एकाचा बळी गेला असून रुग्णांची संख्या 49 वर पोहोचली आहे.

राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना सुरु केल्या आहेत. राज्यातील शाळा महाविद्यालये बंद करण्यात आली आहे. सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आली आहेत. त्याचबरोबर राज्यातील लहान-मोठी मंदिरे भाविकांसाठी बंद करण्यात आली आहे. असे असताना मुंबईतील प्रसिद्ध हाजी अली दर्गा ट्रस्टने दर्गा बंद न करण्याचा अजब निर्णय घेतला आहे. पण, काही बंधने दर्ग्यावर येणाऱ्या भाविकांसाठी घालण्यात आल्याची माहिती हाजी अली दर्गा ट्रस्टचे प्रशासकीय अधिकारी मोहम्मद अहमद ताहेर यांनी दिली आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दर्गा प्रत्येक एक तासानंतर सॅनिटाईज करण्यात येणार आहे. दर्गा आधी भाविकांसाठी दिवसभरात 10 ते 11 तास खुला ठेवण्यात येत होता. आता मात्र, केवळ 4 ते 5 तास खुला ठेवण्यात येणार आहे. नमाज पठणासाठीही कमीत कमी भाविकांनी दर्ग्यावर यावे, असे आवाहन देखील ट्रस्टने केले आहे.

हाजी अली दर्ग्यावर दररोज 50 हजारांहून जास्त भाविक येतात. या पार्श्वभूमीवर दर्ग्याची स्वच्छता आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष काळजी घेण्यात येत असून प्रत्येक एक तासानंतर दर्गा सॅनिटाईज करण्यात येणार असल्याचे मोहम्मद अहमद ताहेर यांनी सांगितले आहे.

Leave a Comment