गुरुडोंग्मार- सिक्किम मधील पवित्र सरोवर


फोटो सौजन्य नवभारत टाईम्स
सिक्किम हे हिमालयाच्या पर्वत रंगात वसलेले राज्य अतिशय शांत, सुंदर आणि मन प्रसन्न करणारे ठिकाण आहे. यामुळेच सिक्किमला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. हिमालाच्या कुशीत सर्वाधिक उंचीवर जी सरोवरे आहेत त्यातील एक अतिशय सुंदर सरोवर सिक्किम मध्ये असून त्याचे नाव आहे गुरुडोंग्मार सरोवर. सिक्कीमच्या लाचेन मधून या सरोवराला जाता येते. सुंदर निळ्याशार पाण्याचे हे सरोवर वर्षातील बहुतेक काळ गोठलेले असते पण त्याचे विशेष म्हणजे कडाक्याच्या थंडीत सुद्धा या सरोवराचा एक भाग कधीच गोठत नाही.

चारी बाजूनी पहाडांनी वेढलेले हे सरोवर समुद्रसपाटीपासून ५४३० मीटर म्हणजे साधारण १६ ते १७ हजार फुट उंचीवर आहे. येथे पोहोचताच स्वर्गभूमीत आल्याचा फील येतो. शीख आणि बौध्द धर्मियांसाठी हे पवित्र सरोवर आहे. असे मानले जाते की शिखांचे पहिले गुरु नानकसाहेब तिबेटला जात होते तेव्हा त्यांना तहान लागली. तेव्हा तहान भागविण्यासाठी त्यांनी या गोठलेल्या सरोवरात हातातील छडीने छेद केला तेव्हापासून हा भाग थंडीतही गोठत नाही.


बौध्द धर्मियांच्या मतानुसार त्यांचे गुरु पद्मसंभव तिबेटला जात असताना उपासनेसाठी येथे थांबले होते. तेव्हा येथील लोकांनी थंडीत प्यायला पाणी मिळत नाही असे सांगितले तेव्हा त्यांनी या सरोवरावर हात ठेवला. त्याबरोबर सरोवराचा एक भाग वितळून पाणी निर्माण झाले. तेव्हापासून सरोवराचा हा भाग कितीही थंडी पडली तरी गोठत नाही असे मानले जाते.

या ठिकाणी फक्त भारतीय पर्यटकच जाऊ शकतात. लाचेन पासून हे सरोवर ६८ किमी अंतरावर असून प्रवास खडतर आहे. पहाटे तीनच्या सुमारास प्रवास सुरु करावा लागतो. सरोवरापाशी फार वेळ थांबता येत नाही. कारण हवा विरळ असल्याने स्वसनास त्रास होऊ शकतो त्यामुळे लगेच परत फिरावे लागते.

Leave a Comment