अमेरिका आणि इंग्लंडला बसू शकतो कोरोनाचा सर्वात जास्त फटका


लंडन – जगभरामध्ये कोरोनाने थैमान घातले असून आत्तापर्यंत जवळपास ८ हजार जणांचा जगभरामध्ये मृत्यू झाला आहे. तर चीनच्या वुहान प्रांतापेक्षाही बिकट परिस्थिती इटलीमध्ये झाली आहे. कोरोना संसर्गामुळे एका दिवसात ३०० पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत साडेसहा हजार नागरिकांना अमेरिकेत लागण झाली असून ११२ जण दगावले आहेत. तर इंग्लडमधील १ हजार ९५० जणांना कोरोनाची लागण झाली असून ७१ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, इंग्लमधील अभ्यासकांचा धक्कादायक अहवाल समोर आल्यामुळे तेथील सरकारने कडक निर्बंध जारी केले आहे.

अमेरिका आणि इंग्लडमध्ये कोरोना व्हायरसमुळे लाखो जणांचा मृत्यू होणार असल्याचे अभ्यासातून पुढे आले आहे. लंडनमधील इंपिरीयल कॉलेजमध्ये नील फर्ग्युसन हे मॅथॅमॅटिकल बायोलॉजी या विषयाचे प्राध्यापक आहेत. हा अभ्यास त्यांच्या टीमने केला आहे. त्यांच्या अभ्यासानुसार, कोरोनामुळे अमेरिकेत २२ तर इग्लंडमध्ये ५ लाख कोरोनामुळे दगावणार असल्याचे म्हटले आहे. हा अंदाज इटलीमधील कोरोनाच्या प्रसाराचा अभ्यास करून वर्तवण्यात आला आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉनसन यांनी या अभ्यासानंतर आणखी कडक निर्बंध लागू केले आहेत. लोकांच्या सार्वजनिक जीवनावर बंधने घालण्यात आली आहेत. फर्ग्युसन यांच्या टीमने येत्या काळात कोरोनाचा प्रभाव कमी होण्याचे चिन्ह नसल्याचा अंदाज काढला आहे. सरकारने कोरोनाच्या प्रसारानंतर संशयित रुग्णांना अलिप्त ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, नागरिकांवर बाहेर पडण्यासंबधी कडक निर्बंध लागू न केल्यामुळे त्याचा अधिक गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

त्याचबरोबर इंपिरीयल कॉलेजमध्ये संसर्गजन्य आजारांचा अभ्यास करणारे प्राध्यापक अझरा घनी यांनी कडक सामाजिक निर्बंध जसे की, क्लब, पब आणि चित्रपटगृहांमध्ये नागरिकांना जाण्यास बंधने घालावी. त्यामुळे कोरोनाचा प्रसार कमी करता येईल. कोरोना संसर्गामुळे आर्थिक परिस्थितीवर आणि एकंदर समाजावर मोठा परिणाम होणार असल्याचे सांगितले.

Leave a Comment