केरळातील या ‘करोना’ मुळे मालक मालामाल


फोटो सौजन्य पत्रिका
वुहान मध्ये जन्मलेल्या करोना विषाणूने जगातील १२२ देशात हातपाय पसरले आहेत. आज सर्व माध्यमात करोना शिवाय दुसरी चर्चा नाही. करोनामुळे होत असलेल्या नुकसानीचे आकडे प्रसिध्द होत आहेत. मात्र केरळात करोना एका व्यक्तीसाठी अतिशय लाभदायक ठरला आहे.जगभरात करोना विषाणूमुळे लोक घराघरात अडकून पडले आहेत तरी केरळात मात्र या करोना बरोबर सेल्फी घेण्यासाठी एकच गर्दी उसळत असल्याचे दिसून येत आहे.

केरळच्या मुवत्तूपुझा मध्ये करोना नावाचे एक कापड दुकान काही वर्षापूर्वी सुरु झाले होते. दुकानाच्या मालकाने दुकानाचे हे नाव काही अगोदर ठरविलेले नव्हते. मात्र अनेक नावांवर विचार करूनही दुकानाचे नाव ठरविता येईना तेव्हा त्यांनी सरळ डिक्शनरीचा आधार घेतला आणि त्यात करोना नाव आवडले म्हणून हे नाव दुकानासाठी निश्चित केले. करोना टेक्स्टाईल असे या दुकानाचे नाव आहे. इतके दिवस या नावाने फारसे कुणाचे लक्ष वेधून घेतले नव्हते पण आता घरी दारी, देशात विदेशात फक्त करोनाची चर्चा सुरु झाल्यावर येथील लोक या दुकानाकडे एकदम आकर्षित झाले.

गेले काही दिवस दुकानासमोर लोक जमतात, सेल्फी घेतात तसेच दुकानात खरेदीसाठी गर्दीही करतात असा अनुभव मालकांना येत आहे. अर्थात आपल्या ग्राहकांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी दुकानदार घेत असून दुकानात येणाऱ्यांना हँड सॅनिटायझर दिला जात आहे असेही समजते.

Leave a Comment