पुण्यातील घाऊक आणि किरकोळ व्यापार 3 दिवस बंद


पुणे : राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 39 वर पोहोचली असून पुण्यामध्ये यातील सर्वाधिक रुग्ण असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुण्यासह पिंपरी-चिंचवड आणि कॅन्टोमेंट परिसरात कालपासून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यातच आता कोरोनाला रोखण्यासाठी पुण्यातील घाऊक आणि किरकोळ व्यापार आजपासून तीन दिवस बंद राहणार आहेत.

त्याचबरोबर किराणा, जीवनावश्यक वस्तू, दूध डेरीज, औषधे, भाजीपाला, फळे वगळता इतर दुकाने बंद राहणार असल्य़ाची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पुण्यात संचारबंदी नसून जमावबंदी लागू करण्यात आल्यामुळे कोणत्याही ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोक एकावेळी गर्दी करून उभे राहू शकत नाही.

दरम्यान पुण्यातील प्रसिद्ध बाजारपेठ तुळशीबागनंतर सुप्रसिद्ध हॉंगकॉंग लेन शॉपिंग ही 3 दिवस बंद राहणार आहे. तसेच सावित्रीबाई फुले आणि पुणे विद्यापीठाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ग्रामदैवत कसबा गणपतीचेही दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. न्यायालयाचे काम फक्त 11 ते 2 असे 3 तास चालणार आहे. येरवडा कारागृहातून व्हिडिओद्वारे कैद्यांशी संपर्क करणार असून कैद्यांना न्यायालयात आणले जाणार नाही. तसेच 21 दिवस चाललेले फुरसुंगी, उरुळी ग्रामस्थांचे कचरा विरोधी आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

Leave a Comment