तुमच्या चेहऱ्यावरील ही लक्षणे आहेत कशाची सूचक?


आपला चेहरा, आपण काही न बोलताच, कधी कधी पुष्कळ काही सांगत असतो. याचा फायदा आपण करून घेऊ शकतो. कधी तरी आरशामध्ये आपला चेहरा काळजीपूर्वक न्याहाळा. चेहऱ्यावरून तुम्हाला तुमच्या आरोग्याबद्दल खूप काही समजू शकेल, तसेच भविष्यात कोणते विकार उद्भविण्याची शक्यता आहे, याबद्दल देखील तुमचा चेहरा तुम्हाला बरेच काही सांगत असतो.

जर तुमच्या डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे असतील, किंवा डोळ्यांच्या भोवती सूज असेल, तर हे अपुऱ्या झोपेचे लक्षण असू शकते. त्याचबरोबर अति प्रमाणात धूम्रपान, मद्यपान, कॉफीचे आणि मिठाचे अति सेवन, हार्मोन्स मध्ये घडत असणारे बदल, किंवा त्यांच्यामध्ये असंतुलन, या सर्व कारणांमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसावयास लागून डोळ्यांच्या भोवती सूज ही दिसून येते. त्याचप्रमाणे जर नाकाचा शेंडा सतत लालसर दिसत असेल, तर आपल्या आसपासच्या तापमानातील अचानक बदल, अॅलर्जी, मानसिक तणाव, किंवा सतत येणाऱ्या शिंका यामागचे कारण असू शकेल. ही कारणे दूर केल्यास नाकावरचा लालसरपणा देखील आपोआप दूर होईल.

चेहऱ्यावर अचानक मास किंवा तीळ उद्भवू लागणे, ही खरेतर सामान्य बाब आहे. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर कधी ना कधी तीळ, मस येत असतात. पण ही तीळ किंवा मस जास्त प्रमाणात येऊ लागले, तर मात्र वैद्यकीय सल्ला घेण्याची आवश्यकता असते. विशेषतः जर तीळ जास्त प्रमाणात उद्भवू लागले, किंवा त्यांचा आकार, रंग बदलू लागले, तर वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यायला हवा. तसेच चेहऱ्यावर ‘ बटरफ्लाय रॅश ‘ आली, तर ह्याचे कारण सौंदर्यप्रसाधनांमुळे आलेली अॅलर्जी, हवामातील बदल, किंवा मिठायांचे अति सेवन असू शकते. ही ‘रॅश’ दोन्ही गाल आणि नाकावर पसरते आणि एखाद्या फुलपाखरासारखी दिसते. म्हणून याला बटरफ्लाय रॅश असे म्हणतात.

जर नाकपुड्यांच्या आसपासची आणि तोंडाच्या आसपासची त्वचा सोलवटल्यासारखी दिसत असेल, तर ह्याचे कारण तुमच्या शरीरातील अ,ब, ई, आणि ब जीवनसत्वाची कमतरता असू शकते. त्वचा सोलवटल्यासारखी दिसते, त्याचबरोबर शरीरामध्ये सतत थकवा, लक्ष एकाग्र न करता येणे, केस गळणे, आणि नखे कमकुवत होणे ही लक्षणे देखील शरीरामध्ये जीवनसत्वांची कमतरता दर्शवितात. महिलांच्या चेहऱ्यावर जास्त प्रमाणात केस येणे, हे पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज चे लक्षण असू शकते. ह्या विकारामध्ये महिलांच्या ओव्हरीज नीट काम करीत नसतात. त्यामुळे भविष्यामध्ये गर्भधारणेमध्ये अडचण येऊ शकते.

चेहऱ्यावर आलेले मोठे काळसर डाग, किंवा पिग्मेंटेशन हे हार्मोन्सचा असंतुलनाचे किंवा सतत तीव्र उन्हामध्ये राहिल्याने येतात. महिलांमध्ये हे डाग जास्त प्रमाणात आढळून येतात. विशेषतः गर्भावस्थेत हे डाग दिसून येतात, आणि प्रसूतीनंतर आपोआप दिसेनासे होतात. हे डाग हटविण्यासाठी बाजारामध्ये अनेक तऱ्हेची क्रीम्स, सिरम्स उपलब्ध आहेत. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य क्र्रेम किंवा सिरमची निवड करावी. जर भुवया पातळ होऊ लागल्या किंवा पापण्या गळू लागल्या, तर हे थायरॉइड ग्रंथीचे का सुरळीत सुरु नसल्याचे संकेत आहेत. याचबरोबर सतत थकवा जाणाविणे, अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे ही लक्षणे देखील थायरॉइड संबंधी समस्या दर्शवितात.

Leave a Comment