घरातील कामांमध्ये मुलांना करून घ्या समाविष्ट


घरामधील कामांचा वाटा हा काही केवळ आईचा नसतो. तर आपल्या घरातील लहान मुलांना देखील घरकामामध्ये सहभागी करून घेतले, तर त्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव अगदी लहान वयापासूनच होऊ लागते. लहान मुलांनी निदान स्वतःच्या वस्तू जागेवर ठेवायच्या असा नियम, मुले थोडी कळती झाल्यापासून त्यांच्या मनावर बिम्बविला, तर मुलांना स्वतःच्या वस्तू सांभाळून ठेवण्याची सवय लागेल, आणि त्याचबरोबर घरातील कामाचा भार थोडासा का होईना, पण हलका होईल.

मुलांशी खेळताना किंवा त्यांच्याशी बोलताना त्यांच्या वस्तू सांभाळण्याचे महत्व त्यांना पटवून द्या. मुले शाळेतून घरी आली, की त्यांनी आपले दप्तर जागेवर ठेवणे, युनिफॉर्म, बूट-मोजे जागेवर ठेवणे, या कामांपासून सुरुवात करता येईल. मुले थोडी कळती झाली, की ही कामे मुले सहज करू शकतात. मुले थोडी मोठी झाली, की झाडांना पाणी देणे, किंवा स्वतःची सायकल स्वछ करणे अशी कामे मुलांना द्या. त्यांच्या वस्तूंचा सांभाळ त्यांनीच करायला हवा, हे त्यांना पटवून द्या.

घरामध्ये मुलांचे मित्र-मैत्रिणी आले, की खेळण्यांचा भरपूर पसारा होतो. इतक्या सगळ्या मुलांच्या आगेमागे फिरताना आई आधीच दमून गेलेली असते, आणि सर्वात शेवटी खेळण्यांचा आणि मुलांनी घातलेला पसारा आवरायच्या कल्पनेने तिला आणखीनच थकवा येतो. अश्या वेळी मित्र-मैत्रिणी गेल्यानंतर सर्व खेळणी आवरून ठेवण्याची सवय मुलांना लावावी. यामुळे आईचा भार नक्कीच हलका होईल.

मुलांना स्वतःची पुस्तके, कपडे आवरून ठेवण्यास शिकवावे. सुट्टीच्या दिवशी कपाट आवरणे, पुस्तकांचा कप्पा आवरणे ही कामे मुलांना करायला सांगावीत. मुलांच्या जोडीने आपण देखील या कामांमध्ये सहभागी व्हावे. मुलांशी गप्पा मारता मारता कामे कधी उरकली, कळणार देखील नाही. मुलांनी स्वतःची कामे स्वतः केली, की त्यांची प्रशंसा करण्यास विसरू नका. मुले सर्व कामे अगदी परफेक्ट रित्या करू शकणार नाहीत, पण त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे आवर्जून कौतुक करा. तुमच्या कौतुकाने मुलांना आनंद होईल, आणि आपले काम आपण करण्याची त्यांची नेहमीच तयारी असेल.

Leave a Comment