मधुमेह : ही लक्षणे दुर्लक्षू नका


मधुमेह हा गंभीर आजार आहे. तो आता पसरत चालला आहे कारण माणसाचे शारीरिक कष्ट कमी होत चालले आहेत. यातली गंभीर बाब अशी की, मधुमेह झालेल्या चारा पैकी एकाला आपल्याला तो झाला आहे हे माहीत नसतेे. कारण सगळ्याच देशात आरोग्याच्या बाबतीत प्रतिबंधात्मक उपाय योजण्याबाबत म्हणावी तशी दक्षता घेण्याची पद्धत नाही. काही लोक तर आजार फार विकोपाला गेला तरच उपचार करण्याचा प्रयत्न करतात. मात्र या क्षेत्रातल्या तज्ञांनी मधुमेहाची पूर्वलक्षणे सांगितली असून ती ज्यांच्यात दिसतील त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता तपासणी करून घेतली पाहिजे. ती प्रमुख लक्षणे म्हणजे फार तहान लागणे, फार भूक लागणे वगैरे होत.

तहान आणि भूक इतरही काही कारणांनी लागू शकते पण वारंवार लघवीला जावे लागणे हे मात्र मधुमेहाचे प्रमुख लक्षण आहे. तेव्हा ज्यांना फार वेळा लघवीला जावे लागते त्यांनी रक्ताची आणि लघवीची तपासणी करून घेऊन आपल्याला मधुमेह झालाय का हे तपासून पाहिले पाहिजे. मधुमेहात आपल्या अवयवांना साखरेचा पुरवठा होत नाही आणि त्यामुळे कार्यक्षमता कमी होते. थोडेही काम केले तरीही थकवा येतो. तेव्हा विनाकारण फार थकवा यायला लागला की मधुमेहाचे लक्षण समजून तपासणी करावी. दुसरे एक मोठे लक्षण म्हणजे सतत तोंडाला कोरड पडणे. तसे होत असल्यासही सावध झाले पाहिजे.

लघवीच्या जागी जळजळ होणे हेही एक मधुमेहाचे लक्षण आहे. तशी जळजळ होत असल्यास फार त्रास होत नाही पण तरीही तपासून पाहिले पाहिजे. मधुमेहात दृष्टीवरही परिणाम होतो आणि नजर काही प्रमाणात धूसर होते. मधुमेह हा तसा मूलत: पचनाचा विकार आहे आणि त्यात तणावामुळे पचन नीट होत नाही. पचन नाही म्हणजे खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर ऊर्जेत होत नाही. परिणामी लहान सहान काम केले की थकवा लागतो आणि रुग्ण धापा टाकायला लागतो. छातीत धडधड व्हायला लागते. काही रुग्णांचे वजन कमी व्हायला लागते तर काहींना विनाकारण डोकेदुखीचा त्रास व्हायला लागतो. तसे तर डोकेदुखी ही अनेक कारणांनी होत असते पण मधुमेहातही ती प्रामुख्याने होतेच. तेव्हा वर उल्लेख केलेल्या लक्षणासह विनाकारण डोके दुखायला लागले की सावध झाले पाहिजे. खरे तर ही लक्षणे दिसोत की न दिसोत पण आपण दर काही कालावधीने रक्त आणि लघवी या दृष्टीने तपासून पाहिली पाहिजे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment