तुमचे घर इंटीरिअर डेकोरेटरच्या नजरेतून…


आपल्यापैकी प्रत्येक जण सुंदर घरामध्ये राहण्याची इच्छा मनाशी बाळगून असतो. त्यासाठी आपण आपल्या आवडी प्रमाणे घराची सजावट, वस्तूंची मांडणी, घरातील रंगसंगती या सर्वच गोष्टींची विचारपूर्वक आखणी करीत असतो. पण एखाद्या इंटीरियर डेकोरेटरच्या नजरेतून जर तुम्ही तुमच्या घराकडे पहिले, तर घराची मांडणी करताना ही मंडळी कोणत्या कोणत्या गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष देतात, हे पाहणे अगत्याचे ठरेल.

घराची सजावट, किंवा एकंदर वस्तूंची मांडणी करताना, घरासाठी रंगसंगती निवडताना प्रत्येकजण आपली आवड लक्षात घेत असतो. तरीही इंटीरियर डेकोरेटर्सच्या मते काही गोष्टी अश्या आहेत, ज्यांचा विचार प्रत्येक घरामध्ये झालाच पाहिजे. घरामध्ये प्रवेश करता क्षणीच, तुमच्या घरामध्ये नैसर्गिक उजेड कितपत आहे, आणि कुठे कमी किंवा जास्त आहे, हे कोणताही डेकोरेटर आवर्जून पाहत असतो. नैसर्गिक प्रकाश लक्षात घेऊन तुम्ही घरामध्ये कृत्रिम प्रकाशाची योजना कशी केली आहे, म्हणजेच घरातील लाईट्स कसे आणि कुठे लावले आहेत, ही गोष्ट डेकोरेटर्सच्या मते महत्वाची असते. घरामध्ये उजेड भरपूर असेल, तर घर जास्त प्रशस्त दिसते. कृत्रिम लाईटिंग योग्य प्रकारे केलेले असेल, तर घरामधील सजावट उत्तम प्रकारे हायलाईट होऊ शकते.

तुम्ही तुमच्या घरातील फर्निचर कसे आणि कुठे ठेवले आहे, हे ही डेकोरेटर्सच्या मते महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे भिंतींवर लावलेली उत्तम, पण निवडक पेंटिंग्ज किंवा वॉल हँगिन्ग्ज तुमच्या ‘ टेस्ट ‘ ची, किंवा आवडीनिवडीची सूचक असतात. त्याचबरोबर बैठकव्यवस्था, म्हणजे सोफा किंवा खुर्च्या भिंतींना टेकवून ठेवण्याऐवजी शक्य असेल, तर जरा वेगळ्या पद्धतीने मांडा. पण बैठकव्यवस्था करताना, तिथे बसणाऱ्या सर्वांना एकमेकांचे चेहरे दिसतील आणि संभाषण करणे शक्य होईल अश्या प्रकारची बैठक व्यवस्था हवी.

घरातील शेल्फमध्ये तुम्ही वस्तू कश्याप्रकारे मांडल्या आहेत, हे पाहणे देखील डेकोरेटर्सच्या मते अतिशय महत्वाचे आहे. साधारणपणे घरामध्ये जी स्टोरेज स्पेस असते, तिथे अनेकदा नको असलेल्या वस्तू रचल्या जातात. मोडके, अनुपयोगी सामान, अश्या अनेक वस्तूंनी जागा अडविलेली असते. अश्या वेळी घरातील आवश्यक वस्तू ठेवण्यासाठी जागा उरत नाही. त्यामुळे शेल्फ मधील वस्तूंची मांडणी कशी असेल, याचा विचार करणे आवश्यक आहे. तसेच घरामध्ये प्रवेश करता क्षणी घरामध्ये दरवळणाऱ्या गंधाकडे ही लक्ष द्यावे. जर घरामध्ये सुवास दरवळत असेल, तर घरामध्ये प्रवेश करणाऱ्याचे, व घरामध्ये राहणाऱ्यांचे मन प्रसन्न राहते.

Leave a Comment