आपल्यासाठी योग्य फेस सिरम्स कशी निवडाल?


तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही ज्या वस्तू वापरता, त्यामध्ये फेस वॉश, सनस्क्रीन, मॉईश्चरायझर, एखादा फेस स्क्रब असे असले, की त्वचेची काळजी घेण्यासाठी इतकी साधने पुरेशी आहेत, असे तुम्हाला वाटते. पण या सर्व साधनांमध्ये एका महत्वाच्या साधनाचा समावेश आपण करीत नाही. ते म्हणजे फेस सिरम. त्वचेच्या देखभालीसाठी फेस सिरम अतिशय महत्त्वाचे आहे. यामध्ये त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारी अॅक्टीव्ह तत्वे असतात.

फेस सिरमच्या वापराने त्वचेला पोषण मिळून त्वचेचा पोत सुधारतो व त्वचा नितळ दिसू लागते. तसेच ढिली पडलेली त्वचा पुन्हा आवळली जाऊन त्यावरील सुरकुत्या नाहीशा होतात. त्वचेवर जर काही कारणाने डाग आले असतील, तर फेस सिरम च्या वापराने हे डाग हलके होण्यास मदत होते. त्वचेवरील खुली रंध्रे ( open pores ) फेस सिरम च्या वापराने बंद होऊन ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड्स कमी होतात. सिरम्स मध्ये त्वचेच्या पोषणासाठी आवश्यक असणारी अँटी ऑक्सिडंट्स, हायड्रॉलिक अॅसिड्स, रेटीनॉल्स इत्यादी तत्वे आहेत. सिरम्स ही ‘ water based ‘ असून, क्रीम्स किंवा मॉईश्चरायझर्स प्रमाणे त्वचा तेलकट करीत नाहीत. उलट ही त्वचेमध्ये लवकर शोषली जातात.

बाजारामध्ये निरनिराळ्या प्रकारची फेस सिरम्स उपलब्ध आहेत. यांच्यापैकी एखाद्या सिरम ची निवड करताना दोन गोष्टींचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे. सर्वप्रथम तुम्ही सिरम नाकी कोणत्या कारणासाठी निवडत आहात ते पाहावे. म्हणजे त्वचेचा पोत सुधारायचा आहे, की चेहऱ्यावरील डाग हलके होण्यासाठी सिरम वापरायचे आहे, किंवा चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी व्हाव्यात म्हणून सिरम चा वापर करायचा आहे, हे पाहावे. त्वचेच्या निरनिराळ्या समस्यांकरिता निरनिराळी सिरम्स उपलब्ध आहेत. आपल्याला सिरम चा वापर कोणत्या कारणासाठी करायचा आहे, हे पाहून मग त्यानुसार सिरामची निवड करावी.

तसेच आपली त्वचा कशी आहे, हा ही विचार सिरम निवडताना करायला हवा. म्हणजेच, त्वचा कोरडी आहे, की नॉर्मल आहे, किंवा तेलकट आहे, हे पाहून सिरमची निवड करायला हवी. तसेच त्वचेवर जर अॅक्ने असतील, तर त्याही गोष्टीचा विचार सिरम निवडताना करावा. जर त्वचा तेलकट, अॅक्ने –प्रोन असेल, तर सॅलीसायलिक अॅसिड व रेटीनॉल्स युक्त फेस सिरम निवडावे. जर त्वचा कोरडी असेल, त्वचेवर सुरकुत्या असतील, तर हायड्रॉलिक अॅसिड आणि क जीवनसत्व युक्त सिरम निवडावे. जर त्वचा नॉर्मल असेल, तर ग्लायकोलिक अॅसिड युक्त सिरम निवडावे. याने त्वचेची आर्द्रता टिकून राहण्यास मदत मिळते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment