स्नान करताना ही पथ्ये पाळा


काही लोक स्नान करण्यासाठी अतीगरम पाणी वापरतात. खरे तर स्नान फार गरम पाण्यानेही करू नये आणि फार थंड पाण्यानेही करू नये. कोमट पाण्याने करावे. फार गरम पाण्याने स्नान केल्यास स्नानानंतर अंग हलके वाटते हे खरे आहे पण फार कढत पाण्याचा आपल्या त्वचेवर परिणाम होत असतो आणि अशा पाण्याने त्वचेचा नरमपणा निघून जातो. त्वचा कोरडी पडतेच पण हे कढत पाण्याचे स्नान जर डोक्यावरून केले असेल तर त्यामुळे केसही राठ होतात. हिवाळ्यात लोकांना फार गरम पाण्याने स्नान करण्याचा मोह होतो पण तो टाळला पाहिजे. शिवाय हिवाळ्यात स्नान झाल्याबरोबर ओल्या अंगाला थंड वारेही लागता कामा नये याचीही दक्षता घेतली पाहिजे.

अंगाला साबण लावला जातो पण काही लोक तोच साबण केसालाही लावतात. पूर्वी तर काही भागांत केसाला सोडा लावण्याची पद्धत होती. पण सोडा आणि अंगाला लावण्याचा साबण यात अशी काही रसायने असतात की जी केसांना सहन होत नाहीत. केस फार नाजुक असतात म्हणूनच त्यांना इजा करणार नाहीत अशी रसायने वापरून शाम्पू तयार केला जातो. तोच केसांना लावला पाहिजे. काही लोक शाम्पू वापरायचा म्हणून रोज वापरतात पण तोही रोज वापरता कामा नये. त्यामुळे केस कमजोर होतात आणि लवकर गळायला लागतात. म्हणून शाम्पूचा वापर आठवड्यातून दोनदा किेवा फार तर तीनदा करावा. म्हणजे दोन दिवसाआड शाम्पू वापरावा. खरे तर पूर्वीच्या काळी महिला केसांसाठी रिठे किंवा शिकेकाई वापरत होत्या. त्यात कसलीसी रसायने नसल्याने त्यांचा वापर करणार्‍या महिलांचे केसही निरोगी, दाट, लांब आणि काळे असायचे.

स्नान कधी करावे असा प्रश्‍न विचारला जातो. नियम तर असा आहे की स्नान हे सूर्योदयाच्या आधी केले पाहिजे. सूर्योदयाच्या नंतर स्नान करण्याने त्वचेवर परिणाम होतात. सूर्य उगवण्याच्या आधी स्नान केल्याने मनही प्रसन्न रहाते. महत्त्वाची बाब म्हणजे स्नान लवकर करण्याची सवय लागली की लवकर झोपतून उठण्याचीही सवय आपोआप लागते आणि सूर्योदयाच्या आधी उठणे हा आरोग्याचा खजिना मानला जातो. सारे जग सकाळी सात ते नऊ या वेळेत उठते पण आपण साडेपाच किंवा सहाला उठत असू तर आपण जगाच्या दोन तास पुढे रहातो. दररोज दोन तास पुढे म्हणजे सगळ्या आयुष्यातच सर्वांच्या १० ते १५ टक्के पुढे. तेव्हा सूर्यवंशी होण्याचे टाळले पाहिजे.

Loading RSS Feed
Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment