पुणे – पुण्यामधील एका व्यक्तीवर जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनासंदर्भात अफवा पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंभीर आजाराबाबत अफवा पसरवल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेला हा राज्यातलाही पहिलाच गुन्हा असून हा गुन्हा पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे.
आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत पुण्यात पहिला गुन्हा दाखल
सहायक पोलीस आयुक्त रवींद्र रसाळ याबाबत माहिती देताना म्हणाले, याबाबत काल (रविवारी) पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांनी फिर्याद दिली आहे. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात या फिर्यादीवरुन गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भादंवि कलम १८८, १८२, २९० आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे कलम ५१ ब आणि ५४ नुसार हा गुन्हा दाखल झाला आहे.
एका अनोळखी व्हॉट्सअॅप क्रमांकावरुन विभागीय आयुक्तांना एक संदेश आला होता. त्यामध्ये काही हॉटेल्सची नावे घेऊन तिथे कोरोनाचे रुग्ण असल्यामुळे तिथे कारवाई करा आणि ही हॉटेले बंद करा असा मजकूर होता. हा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीचे नाव जाणून घेण्याचा म्हैसकर यांनी प्रयत्न केला, पण त्याने त्याचे नाव उघड केले नाही. त्यानंतर या संदेशाची खात्री केल्यानंतर असा काही प्रकार नसल्याचे समोर आले. याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडूनही खात्री करुन घेण्यात आल्यानंतर या अनोळखी व्यक्ती विरोधात अफवा पसरवणे आणि शासकीय कर्मचाऱ्यांना खोटी माहिती देणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती रसाळ यांनी दिली.
या व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सध्या सुरु आहे. अशा प्रकारचा पहिला गुन्हा पुणे शहरात दाखल झाला आहे. कोरोना आजारासंदर्भात आवश्यक काळजी तर प्रत्येक नागरिकाने घ्यायची आहे. पण याबाबत कुठल्याही स्वरुपाची अफवा पसरवली जाणार नाही याची देखील दक्षता घ्यावी असे आवाहन यावेळी सहायक पोलीस आयुक्त रवींद्र रसाळ यांनी जनतेला केले आहे.