‘त्रिफळा‘ चा अर्थ ‘तीन फळे’ असा असून, ह्या तीन औषधी फळांच्या संगमाने त्रिफळा ही आयुर्वेदिक औषधी तयार केली गेली आहे. ही औषधी शरीराला अतिशय लाभकारी आहे. आमलकी, बिभितकी, आणि हरीतकी या तीन औषधींनी युक्त त्रिफळा शरीरामध्ये उद्भविणाऱ्या निरनिराळ्या व्याधींवर अतिशय गुणकारी आहे. त्रिफळाच्या सेवनाने शरीरातील घातक द्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते. तसेच पचनाशी निगडीत तक्रारी याच्या नियमित सेवनाने दूर होतात. बद्धकोष्ठाचा विकार त्रिफळाच्या सेवनाने दूर होतो. त्रिफळा हे नैसर्गिक अँटी ऑक्सिडंट आहे.
प्रभावी आयुर्वेदिक औषधी – त्रिफळा
त्रिफळा मध्ये वापरले जाणारे तीनही घटक निरनिराळ्या प्रकारे शरीराला लाभकारी आहेत. आमलकी शरीराला थंडावा देणारी, शरीरातील उष्णता कमी करणारी, पित्त शमविणारी, आणि लिव्हरचे आरोग्य सांभाळणारी औषधी आहे. बिभितकी कफ रोखणारी, श्वसनासंबंधीच्या तक्रारी दूर करणारी औषधी आहे, तर हरीतकी कफ, वात आणि पित्त या तीनही दोषांना रोखणारी, व शरीरातून घातक द्रव्ये बाहेर पडण्यास मदत करणारी औषधी आहे. याचा उपयोग वजन कमी करण्यासाठी देखील केला जातो.
वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम यांच्या जोडीला त्रिफळा चे सेवन फायदेशीर ठरते. आपण सेवन करीत असलेल्या अन्नाचे पचन चांगल्या तऱ्हेने होणे अतिशय आवश्यक असते. त्यासाठी त्रिफळा चे सेवन लाभकारी आहे. तसेच आपण सेवन करीत असलेल्या अन्नामधून पौष्टिक तत्वे शरीरामध्ये शोषली जाण्याच्या कामी ही त्रिफळा सहायक आहे. केसांच्या आणि डोळ्यांच्या आरोग्याकरिता देखील त्रिफळा गुणकारी आहे. ज्यांना भूक लागत नसेल, त्यांनी त्रिफळाचे नियमित सेवन करावे, त्रिफळा जठराग्नी प्रदिप्त करणारे आहे, तसेच खाल्लेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होण्यासही सहायक आहे.
त्रिफळाचे सेवन करण्याकरिता अर्धा लहान चमचा त्रिफळा चूर्ण एक कप गरम पाण्यामध्ये मिसळावे. हे पाणी थोडे थंड होऊ द्यावे, आणि त्यानंतर ह्या पाण्याचे सेवन करावे. षड्रसांपैकी पाच रस त्रिफळा मध्ये आहेत. ( गोड, आंबट, तुरट, तिखट, कटू ) हे पाचही रस शरीरासाठी उत्तम आहेत. त्रिफळा घेताना शक्यतो रिकाम्या पोटी घ्यावे. रात्री झोपण्याआधी त्रिफळा घेत्याने वारंवार लघवीची भावना होऊ शकते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर काही खाण्यापिण्याच्या आधी त्रिफळाचे सेवन करणे चांगले.