डेस्टीनेशन वेडिंग प्लॅन करताना…


जसजसा काळ बदलत चालला आहे, तसतश्या आपल्या काही परंपरा देखील बदलत चालल्या आहेत. लग्नसोहळ्याबद्दल बोलायचे झाले, तर पूर्वीच्या काळी लग्ने घरामध्ये किंवा देवळांमध्ये होत असत. त्यानंतर मंगल कार्यालये आली, मग रिसोर्ट्स मध्ये लग्नसमारंभ पार पडू लागले. पण सध्या लोकप्रिय होत आहेत, ती म्हणजे डेस्टीनेशन वेडिंग्ज.. आजकाल लग्नसोहळ्या साठी आपल्या राहत्या शहरापासून थोडे लांब, किंवा अगदी परदेशामधील, शक्यतो एखाद्या सुंदर पर्यटनस्थळाची निवड केली जाते. वर-वधू, त्यांचे परिवारजन आणि आप्तेष्ट यांच्या उपस्थितीत हा सुंदर लग्नसोहळा पार पडतो. अनुष्का शर्मा-विराट कोहली यांचा इटलीमध्ये पार पडलेला विवाहसोहळा याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. आजकाल डेस्टीनेशन वेडिंग खूप लोकप्रिय असल्यामुळे बहुतेक पर्यटनस्थळी या साठी लागणारी सर्व व्यवस्था करता येणे शक्य होऊ लागले आहे. त्यामुळे अश्या प्रकारचा विवाहसोहळा प्लॅन करताना काही गोष्टी लक्षात घेतल्या, तर अगदी अनोळखी ठिकाणी देखील होणारे हे विवाहसोहळे अतिशय उत्कृष्ट रित्या पार पडतात.

जर विवाह सोहळा परदेशातील एखाद्या ठिकाणी आयोजित केला जाणार असेल, किंवा भारतामध्येच, पण इतर राज्यामध्ये आयोजित केला जाणार असेल, तर तेथील स्थानिक लोकांशी संपर्क करण्यामध्ये भाषेची अडचण येऊ शकते. अश्या वेळी आवश्यक ती बोलणी करण्यासाठी ती विशिष्ट भाषा जाणणाऱ्या व्यक्तींची मदत घ्यावी. त्याने संपर्क ठेवणे आणि आवश्यक त्या माहितीची देवाणघेवाण सोपी होते.

जर विवाहसोहळा इतर प्रांतांमध्ये आयोजित होणार असेल, उदाहरणार्थ, एखाद्या महाराष्टीयन जोडप्याचा विवाह जयपूर, किंवा उदयपुर सारख्या ठिकाणी होणार असेल, तर तेथील खानपानाच्या पद्धती लक्षात घेऊन आपल्याला मेजवानीचा बेत आखायला हवा. अगदी आपल्या पद्धतीप्रमाणे मेजवानीतील पदार्थ हवे असतील, तर आपल्यासोबत केटरर नेण्याबाबत विचार करता येईल.

विवाहसोहळ्यासाठी घालण्याचे सर्व पोशाख आधीपासूनच तयार ठेऊन आवश्यक त्या पोषाखांच्या ट्रायल्स केलेय असाव्यात. असे केल्याने पोषाखामध्ये काही बदल करायचे असल्यास वेळेवर करता येतील. त्याचप्रमाणे आपल्यासोबत नेण्यासाठी मेकअप आर्टिस्ट ही बुक करून ठेवावा. मेकअप आर्टिस्ट जर विवाह सोहळा जिथे पार पडायचा आहे, तेथील असेल, तर आपल्या पोषाखांबद्दल त्यांना आगाऊ माहिती द्यावी. म्हणजे पोशाखानुसार मेकअप, किवा केशरचना याचे नियोजन करणे सोपे होते.

आपण डेस्टीनेशन वेडिंग साठी अगदीच अनोळखी ठिकाण निवडले असल्यास त्याबद्दल आवश्यक ती माहिती मिळवावी. शक्यतो त्या ठिकाणी जाऊन येणे उत्तम. तिथे जाऊन, जिथे विवाह सोहळा पार पडायचा आहे, त्या ठिकाणी असलेल्या स्थानिक लोकांशी प्रत्यक्षात बोलणी करावीत. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्याच, तरी त्यांचे निदान त्वरित होऊ शकते.

डेस्टीनेशन वेडिंग हा खूप खर्चिक सोहळा आहे. तसेच खास विवाहासाठी पाहुणे मंडळींना येण्याजाण्याचा करावा लागणारा खर्च किंवा वेळेचा अभाव, किंवा अचानक उद्भविलेली काही अडचण, या कारणांसाठी आपण आमंत्रित केलेली काही पाहुणे मंडळी लग्नसमारंभाला उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यामुळे ऐन वेळी काही पाहुणे मंडळी आपला येण्याचा कार्यक्रम रद्द करू शकतात. ती ही शक्यता गृहीत धरावी.

Leave a Comment