५३ वर्षापूर्वी गायब झालेल्या या पंतप्रधानाचा अजूनही नाही तपास


फोटो सौजन्य कॅच न्यूज
कोणत्याची देशाचे राष्ट्रपती, राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान यांच्यासुरक्षेची काळजी फार काटेखोरपणे घेतली जात असते. अश्या परिस्थितीत ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान गायब व्हावेत आणि ५३ वर्षे उलटूनही त्याचा कोणताही मागमूस नसावा हे मोठे रहस्य म्हटले पाहिजे. एखाद्या देशाचा पंतप्रधान हरवतो आणि अर्धशतक उलटून गेल्यावरही त्याचा पत्ता लागत नाही हे नवलही म्हणता येईल. पण हे प्रत्यक्षात घडले आहे.

ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान हेरॉल्ड एडवर्ड होल्ट यांची ही कथा आहे. ते ऑस्ट्रेलियाचे १७ वे पंतप्रधान होते. २६ जानेवारी १९६६ रोजी तत्कालीन पंतप्रधान मेनजिस निवृत्त झाल्यावर होल्ट यांची या पदावर बिनविरोध निवड केली गेली होती. त्याचवर्षी निवडणूक लढवून ते प्रचंड बहुमताने विजयी झाले होते. त्यांना मासे पकडण्याचा आणि पोहण्याचा छंद होता.

१७ डिसेंबर १९६७ रोजी म्हणजे पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यावर एक वर्षाने ते व्हिक्टोरीया शहरातील शेविओट बीचवर पोहायला उतरले असताना अचानक गायब झाले. खूप तपास करूनही त्यांचा मागमूस लागला नाही. शेवटी २० डिसेंबर १९६७ रोजी त्यांना अधिकृत मृत घोषित केले गेले. मात्र त्याचा देह शेवटपर्यंत मिळाला नाही. आज इतक्या वर्षानंतरही त्यांच्या मृत्यूबाबत अनेक तर्क लढविले जातात. कुणाच्या मते त्यांना शार्कने खाल्ले असावे, कुणाच्या मते ते बुडाले असावेत, कुणाला वाटते त्यांचा खून झाला असावा तर कुणाला वाटते त्यांनी आत्महत्या केली असावी. होल्ट याना परग्रहावरील एलियननी पळवून नेले असावे असाही एक तर्क केला जातो.

Leave a Comment