या पठ्ठ्याने दोन वर्षात खाऊन संपविले अख्खे विमान


फोटो सौजन्य कॅच न्यूज
कुणाला काय खायला आवडते किंवा प्यायला आवडते हा ज्याचा त्याचा आवडीचा प्रश्न आहे. जगात विविध आवडी निवडी असलेले लाखो लोक राहतात. सध्या चीनी लोकांच्या खाण्याचा आवडी हा जगात चर्चेचा विषय बनला आहे तो करोना विषाणूमुळे. पण आपण ज्या वस्तू खाण्याची कल्पनाही करू शकणार नाही अश्या अनेक वस्तू बघता बघता फस्त करणारी एक व्यक्ती जगात होऊन गेली. तिचे नाव मिचेल लिटोटो. फ्रांसचा रहिवासी असलेला मिचेल जन्मला १५ जून १९५० रोजी आणि त्याचा मृत्यू झाला वयाच्या ५७ व्या वर्षी २७ जून २००७ रोजी. या सत्तावन वर्षांच्या आयुष्यात मिचेलने जे खाल्ले ते ऐकले तर जीभ टाळ्याला लागल्याशिवाय राहणार नाही आणि हाताचे बोट तोंडात गेल्याशिवाय राहणार नाही.

वयाच्या १६ व्या वर्षापर्यंत मिचेल नॉर्मल माणसाप्रमाणे खातपित असे पण त्यानंतर त्याला असामान्य वस्तू खाण्याची चटक लागली. म्हणजे नेहमी माणूस खातो त्या केळी, ब्रेड, अंडी असे पदार्थ त्याला पचेनासे झाले पण त्याजागी काचा, लोखंड अश्या वस्तू त्याला सहज पचू लागल्या. हा एक प्रकारचा आजार असून वैद्यकीय भाषेत त्याला ‘पिका’ असे नाव आहे. या आजारात साधे खाणे पचत नाही पण असामान्य वस्तू सहज पचतात. मिचेलने सुरवातीला नखे, काचा खायला सुरवात केली आणि त्याच्या आयुष्यात त्याने अंदाजे ९ टन म्हणजे ९० हजार किलो धातू खाल्ला. लोक त्याला विचित्र म्हणत पण तो स्वतःला सामान्य समजत असे.


१९६६ साली त्याने असल्या वस्तू खाऊन दाखविण्याचे प्रयोग सुरु केले आणि तिकीट काढून लोक गर्दी करू लागले. त्याने पलंग, सायकली, टीव्ही, संगणक सगळे हजम केले. धातूचे छोटे छोटे तुकडे तो खायचा आणि घशातून ते सहज खाली जावेत म्हणून पेट्रोल प्यायचा. सोबत तेव्ह्डेच पाणी आणि मिनरल ऑइल प्यायचा. पेट्रोल मुळे घसा बुळबुळीत होतो आणि गिळायला त्रास होत नाही असे त्याचे म्हणणे होते. १९७८ मध्ये त्याने सेसना १५० जातीचे एक विमान खायला सुरवात केली आणि दोन वर्षात सगळे विमान फस्त केले. त्याच्या नावाची नोंद गीनिज बुक मध्ये करण्यात आली आहे.

डॉक्टर्सच्या म्हणण्यानुसार मिचेलच्या आतड्यात एक संरक्षण लेअर निर्माण झाले होते जे सामान्य माणसाच्या आतड्यात आढळत नाही. त्यामुळे धातू, रबर, काचा पचविल्या जातात पण हलके अन्नपदार्थ मात्र अश्या लोकांना पचविता येत नाहीत.

Leave a Comment