करोनामुळे चीनबाहेरील सर्व अॅपल रिटेल स्टोर्स बंद


फोटो सौजन्य इकोनॉमिक टाईम्स
आपल्या ग्राहकांना करोना संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी अॅपल इंकने कंपनीची चीन बाहेरील सर्व रिटेल स्टोर्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याचा परिस्थितीनुसार २७ मार्च पर्यंत सर्व स्टोर्स बंद राहणार आहेत. अॅपलचे सीईओ टीम कुक यांनी या संदर्भात कंपनीच्या वेबसाईटवर एक पोस्ट केली आहे. त्यानुसार जगभरातील रिटेल स्टोर्स बंद राहिली तरी स्टोर्स मधील कर्मचाऱ्यांचे पूर्ण वेतन दिले जाणार आहे. शिवाय करोना प्रभावित लोकांच्या मदतीसाठी कंपनी १५ दशलक्ष डॉलर्स दान देणार आहे. अर्थात या काळात रिटेल स्टोर्स मध्ये होणारी सर्व कामे ऑनलाइन केली जाणार आहेत.

चीनमध्ये अॅपलची ४२ स्टोर्स आहेट. चीन मध्ये करोनाची सुरवात झाल्यावर ही सर्व स्टोर्स १ फेब्रुवारीपासून बंद केली गेली होती मात्र आता चीन मध्ये करोनाचा प्रभाव कमी झाल्यावर ती पुन्हा सुरु केली गेली आहेत. चीनबाहेर करोनाचा प्रभाव वाढता आहे. त्यामुळे जगभरातील ४६० स्टोर्स बंद केली जात असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. यात एकट्या अमेरिकेत कंपनीची २७० स्टोर्स असून ती अगोदरच बंद झाली आहेत. करोनाचा आयफोन विक्रीलाही चांगलाच तडाखा बसला आहे.

करोना प्रकोपामुळे मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेस २०२०, गुगल १/० २०२०, फेसबुक एफ ८, गेम डेव्हलपर कॉंग्रेस २०२०, मायक्रोसोफ्ट एमव्हीपी समिट असे अनेक बडे इव्हेंट रद्द केले गेले आहेत तसेच शाओमी, रिअलमी, ओप्पो अश्या अनेक बड्या कंपन्या त्यांचे प्रोडक्ट ऑनलाईन लाँच करत आहेत. फेसबुक, ट्विटरचे कर्मचारी घरून काम करत आहेत.

Leave a Comment