सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे नेमके काय व तो कसा टाळता येऊ शकतो?


भारतीय महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांमध्ये सर्व्हायकल कॅन्सरचे प्रमाण इतर कर्करोगांच्या मानाने सर्वाधिक आहे. ह्या कर्करोगावर वेळीच उपचार केले गेले नाहीत, तर हा रोग प्राणघातक ठरू शकतो. महिलांमध्ये साधारण पंधरा ते पंचेचाळीस या वयामध्ये सर्व्हायकल कॅन्सर आढळून येतो. भारतामध्ये आढळणाऱ्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये सुमारे अकरा टक्के प्रमाण सर्व्हायकल कॅन्सर असणाऱ्या रुग्णांचे आहे. यापैकी केवळ ३ टक्के महिलांमध्ये या कर्करोगाचे निदान होऊ शकते. बाकी महिलांमध्ये ह्या रोगाचे निदान न होऊ शकल्याने वेळेवर उपचार करणे शक्य होत नाही.

सर्व्हायकल कॅन्सर हा सर्विक्सचे लायनिंग, म्हणजेच गर्भाश्यायाच्या मुखाला ग्रासणारा कर्करोग आहे. सर्विक्स च्या लायनिंगमध्ये दोन तऱ्हेच्या कोशिका असतात. त्यांच्यापैकी एका तऱ्हेच्या कोशिका सपाट ( फ्लॅट ) असतात, तर दुसऱ्या स्तंभ कोशिका असतात. गर्भाशायामध्ये एक कोशिका दुसऱ्या कोशिकेमध्ये जिथे परिवर्तीत केली जाते, त्या भागाला स्क्वेमो-कॉलमर जंक्शन असे म्हटले जाते. या भागामध्ये सर्व्हायकल कॅन्सर होण्याचे प्रमाण सर्वात अधिक असते. गर्भाशयाच्या मुखाशी विकसित होणारा कॅन्सर अतिशय सावकाशीने पसरतो. सर्व्हायकल कॅन्सर ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, म्हणजेच एचपीव्ही मुळे उद्भवतो. हा व्हायरस यौन संबंधातून किंवा त्वचेच्या संबंधातून फैलावतो. काही महिलांच्या सर्विक्स मध्ये एचपीव्ही व्हायरसचे संक्रमण सतत होत असल्याने अश्या महिलांमध्ये सर्व्हायकल कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. ह्याचे निदान नियमित पॅप स्मियर नामक परीक्षणाद्वारे करता येते. या परीक्षणामध्ये सर्विक्सच्या पेशींचा नमुना घेतला जाऊन ह्या पेशी पुढे तपासणीसाठी पाठविल्या जातात.

सर्व्हायकल कॅन्सरची काही लक्षणे दिसून येतात. यांच्यापैकी कोणतीही लक्षणे आढळ्यास त्वरित तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते. योनीमार्गातून जास्त रक्तस्राव होणे, मासिक धर्म सुरु नसताना किंवा यौन संबंधांनंतर रक्तस्राव होणे, सामन्य काळापेक्षा अधिक काळ मासिक धर्म सुरु राहणे, इत्यादी लक्षणे आढळ्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. सर्व्ह्याकाल कॅन्सर न होण्याकरिता आता लसीकरण उपलब्ध आहे. तसेच आधुनिक स्क्रीनिंग तंत्रज्ञानांच्या मदतीने या रोगाचे निदान लवकर होऊ शकते. जर सर्व्हायकल कॅन्सरचे निदान वेळेत झाले, तर शस्त्रक्रिया, रेडियेशन थेरपी, केमोथेरपी या उपचारपद्धतींनी कर्करोग बरा होऊ शकतो.

तज्ञांच्या म्हणण्यानुसार सर्व्हायकल कॅन्सर टाळता येण्यासाठी काही खबरदारी घेता येऊ शकते. सुरक्षित यौनसंबंध असणे गरजेचे आहे. तसेच दर दोन वर्षांनी पॅप स्मियर टेस्ट करविणे आवश्यक आहे. यामुळे रोगाचे वेळेत निदान करणे सोपे होते. ज्या महिला धूम्रपान करीत असतील, त्यांनी धूम्रपानावर नियंत्रण ठेवायला हवे. कारण धूम्रपानामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होत असते. आपला आहार चौरस असावा. तसेच नियमित व्यायाम असावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment