धावपटूंसाठी या पदार्थांचे सेवन अत्यावश्यक


अनेक देशी विदेशी धावपटू सहभागी होत असणारी मुंबईची मॅरॅथॉन आता अगदी तोंडावर येऊन ठेपली आहे. या आणि अश्या अनेक मॅरॅथॉन मध्ये भाग घेण्यासाठी धावपटू जोरदार तयारी करीत आहेत. एखादी मॅरॅथॉन यशस्वी रित्या पूर्ण करण्यासाठी उत्तम ट्रेनिंगची आवश्यकता असतेच, पण त्याशिवाय वेग आणि एकंदर performance चांगला असण्यासाठी धावपटू त्यांच्या शरीराला कसा आहार देतात हे पाहणे देखील महत्वाचे असते. योग्य वेळी योग्य पद्धतीचा आहार धावपटूच्या शरीराला आवश्यक तो ‘ बूस्ट ‘ देत असतो. शिवाय धावताना शरीराला होणारी इजा टाळण्यासाठी देखील चांगला आहार उपयुक्त असतो. त्यासाठी धावपटूंनी आपल्या आहारात काही पदार्थांचा समावेश आवर्जून करायला हवा.

दुपारच्या वेळी जर धावण्याचा सराव करायचा असेल, तर हाय कार्ब एनर्जी मिळविण्यासाठी केळ्यांचे सेवन करावे. यामध्ये पोटॅशियम मुबलक मात्रेमध्ये असते. त्यामुळे विशेषतः उन्हाच्या वेळी जास्त अंतर पळायचे असेल, तर केळ्याचे सेवन आवर्जून करावे. उन्हामध्ये धावल्याने घामाद्वारे शरीरातील क्षार बाहेर टाकले जातात. केळ्याच्या सेवनाने या क्षारांची भरपाई होत असते. त्यामुळे धावपटूंनी आपल्या आहारामध्ये केळ्यांचा समावेश करायला हवा. तसेच केळ्यांच्या जोडीने सुकामेवा आणि ओट्स चा समावेश ही फायदेशीर ठरतो. सकाळच्या नाष्ट्यामध्ये ओट्स चे सेवन करावे. ओट्समध्ये फायबर मुबलक मात्रेमध्ये आहे, तसेच ओट्स हा पदार्थ लो ग्लायसेमिक इंडेक्स असणारा आहे. म्हणजेच याच्या सेवनाने ब्लड शुगर लेव्हल अतिशय धीम्या गतीने वाढत असते, आणि त्यामुळे शरीरामध्ये जास्त काळ एनर्जी राहते. त्यामुळे धावायला जाण्याआधी नाश्ता करायचा असल्यास ओटमील, केळे आणि सुकामेवा असा नाश्ता घ्यावा.

विना साखर, मीठ, तेल किंवा इतर कोणतेही अॅडीटिव्ह न घातलेले शुध्द पीनट बटर ई जीवनसत्वाचे उत्तम स्रोत आहे. हे जीवनसत्व सर्वोत्तम अँटी ऑक्सिडंट आहे. शेंगदाण्यामध्ये फॅटस् चे प्रमाण जास्त असले तरी यामध्ये शरीरासाठी फायदेशीर असणारे मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स आहेत. यांच्यामुळे ब्लड कोलेस्टेरोल कमी होते. तसेच शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी देखील यांची आवश्यकता असते. त्यामुळे धावल्यानंतर स्नायूंना होणारी इजा लवकर भरून निघण्यास मदत होते. पीनट बटर मध्ये असणारी प्रथिने स्नायूंना बळकटी देतात.

ब्रोकोली या भाजीचा समावेश देखील धावपटूंनी आपल्या आहारामध्ये जरूर करावा. ह्या भाजीमध्ये क जीवनसत्व मुबलक मात्रेमध्ये असून, धावण्यासारखा हाय इंटेन्सिटी वर्क आऊट झाल्यानंतर स्नायूंमध्ये क्रॅम्प्स येणे ब्रोकोलीच्या सेवनाने टाळता येऊ शकते. ब्रोकोली ही भाजी कॅल्शियम, फोलिक अॅसिड आणि ‘के’ जीवनसत्वाने युक्त आहे. ही सर्व तत्वे हाडांना बळकटी देणारी आहेत. त्याचबरोबर दह्याचे सेवन देखील अतिशय फायदेशीर आहे. दह्यामध्ये प्रथिने आणि कर्बोदके दोन्ही आहेत. तसेच शरीराला आवश्यक असणारी अमिनो अॅसिड्स यामध्ये आहेत. धावणे झाल्यानंतर दह्याचे सेवन केल्यास स्नायूंवरील ताण कमी होण्यास मदत होते. यामध्ये असणारे कॅल्शियम हाडांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे.

डार्क चॉकलेटमध्ये असणारे फ्लावेनोल्स शरीरावरील सूज कमी करण्यास मदत करणारी आहेत. त्यामुळे डार्क चॉकोलेट च्या दोन तुकड्यांचे सेवन सुक्यामेव्याच्या जोडीने करावे. तसेच कॉफीमध्ये असणाऱ्या कॅफिनमुळे धावण्यास ताकद मिळते. मात्र कॉफीचे सेवन साखर आणि दुधाशिवाय करायला हवे. पण कॉफीमुळे वारंवार लघवीची भावना होत असल्याने मॅरॅथॉनच्या वेळी कॉफीचे सेवन टाळायला हवे. बटाटे किंवा रताळी देखील केळ्यांप्रमाणेच पोटॅशियमयुक्त आहेत. त्यामुळे यांचा समावेश धावपटूंनी आपल्या आहारामध्ये करायला हवा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment