कोरोनाग्रस्तांसाठी रोनाल्डोने स्वतःच्या हॉटेल्सचे केले रुग्णालयात रुपांतर


जगभरातील बहुतांशी देशांना कोरोनाचा विळखा बसत असतानाच आता सर्वसामान्यांमधील काही देवदूत दहशतीच्या या वातावरणात हिरीरिने पुढाकार घेत कोरोना बाधितांच्या मदतीसाठी धावत आहेत. हे देवदूत शक्य त्या सर्व परिंनी कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावत आहेत. त्यात एक लोकप्रिय नाव देखील जोडले गेले आहे ते म्हणजे फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याचे.

प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेता एक मोठा निर्णय पोर्तुगाल या देशाच्या संघाकडून फुटबॉल खेळणाऱ्या या जागतिक ख्यातीच्या खेळाडूने घेतला आहे. अर्थव्यवस्थेपासून क्रीडा, कला आणि प्रत्येक क्षेत्रावर थेट परिणाम करणाऱ्या या कोरोनाच्या दहशतीमध्येच याचा संसर्ग होणाऱ्यांची संख्याही दिवसागणिक वाढतच आहेत. रोनाल्डोने याच वातावरणात रुग्णांची वाढती संख्या पाहता एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.


त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सर्वांसमोर कोरोनाच्या दहशतीचे गांभीर्य मांडले आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आलेले सर्व इशारे पाळत प्रतिबंधात्मक उपाय अवलंबात आणण्यावर आपण सर्वांनीच भर दिला पाहिजे असेही त्याने या पोस्टच्या माध्यमातून म्हटले. कोणत्याही कामापेक्षा एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवण्यालाच प्राधान्य दिले गेले पाहिजे, असा सूर त्याने आळवला.

पोर्तुगालमधील आपल्या सर्व हॉटेल्समध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी सामाजिक भान जपणाऱ्या याच खेळाडूने रुग्णालये सुरु केली आहेत. या हॉटेल्समध्ये कोरोनाची लागण झालेल्यांवर विनामूल्य उपचार केले जाणार आहेत. रुग्णांच्या उपचारांपासून ते डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांच्या पगाराचा सर्व खर्च ख्रिस्तियानो स्वत: करणार आहे. त्याने उचललेल्या या पावलाची सर्वत्र चर्चा होत आहे. शिवाय अनेकांनी त्याच्या या उपक्रमाचे कौतुक देखील करत आहेत.

Leave a Comment