चेहऱ्यावरील ब्लॅक हेड्स नाहीसे करण्यासाठी अवलंब हे उपाय


चेहऱ्यावरील कोणत्याही प्रकारच्या डागांमुळे चेहरा अनाकर्षक दिसू लागतो. विशेषतः नाकावर व हनुवटीवर येणाऱ्या ब्लॅक हेड्स मुळे चेहऱ्याची सगळी रयाच जाते. वातावरणातील प्रदूषणामुळे चेहऱ्यावर सतत त्वचेला घातक घटकांची आवरणे चढत असतात. तसेच त्वचेवरील मृत पेशी देखील चेहऱ्यावर साठत असतात. जर तुम्ही तुमचा चेहरा नियमितपणे एक्सफोलियेट केला नाही, म्हणजे चेहऱ्यावर साठलेली घाण हटविण्याकरिता एखाद्या चांगल्या प्रतीच्या स्क्रबने चेहरा स्वच्छ केला नाही, तर या घाणीचे रूपांतर ब्लॅक हेड्स मध्ये होते.

हे ब्लॅक हेडस् काढण्याकरिता अनेकदा निरनिराळ्या रासायनिक प्रक्रियांचा वापर केला जातो. पण काही काळाने हे ब्लॅक हेड्स परत येऊ लागतात. असे होऊ नये या करिता काही घरगुती उपाय आहेत. ह्या उपायांचा नियमित अवलंब केल्यास ब्लॅक हेड्स नाहीसे होतीलच, शिवाय परत परत येणारही नाहीत. ब्लॅक हेड्स हटविण्याकरिता तीन वेगवेगळे फेस पॅक्स वापरता येऊ शकतात.

शुगर पॅक – हा पॅक बनविण्याकरिता एका भांड्यामध्ये तीन मोठे चमचे साखर, दोन मोठे चमचे मध आणि एका लिंबाचा रस एकत्र करावा. हे मिश्रण कमी आचेवर साखर विरघळेपर्यंत ठेवावे. साखर विरघळल्यानंतर या मिश्रणाची घट्ट पेस्ट तयार होते. ही पेस्ट वाटीमध्ये काढून घेऊन त्यामध्ये काही थेंब ग्लिसरीन मिसळावे. पेस्ट थोडी कोमट झाल्यानंतर हलक्या हाताने नाकावर व हनुवटीवर लावावी. वीस मिनिटे ही पेस्ट तशीच राहू देऊन त्यानंतर काढून टाकावी. या पेस्ट मुळे नाकावरील व हनुवटवरील ब्लॅक हेड्स निघून जातील.

मिल्क पॅक – हा पॅक बनविण्यासाठी एका मोठ्या चमचा दुधामध्ये तितकेच विना स्वादाचे ( नॉन फ्लेवर्ड ) जिलेटीन घालावे. हे मिश्रण दोन ते तीन मिनिटे मायक्रोवेव्हमध्ये गरम करून घ्यावे. त्यानंतर हे मिश्रण थोडे थंड करून घेऊन नाकावर व हनुवटीवर दोन तीन थर देऊन लावावे. अर्धा तास हे मिश्रण चेहऱ्यावर ठेवावे, व त्यानंतर काढून टाकावे. हा पॅक वापरल्यानंतर लगेचच ब्लॅक हेड्स निघून गेल्याचे दिसेल.

एग स्ट्रीप – हा मास्क बनविण्याकरिता अंड्यातील पांढरा द्रव काढून घेऊन चांगल्या रीतीने फेटून घ्यावा. जेव्हा त्याचा चांगला फेस तयार होईल, तेव्हा तो फेस नाकावर व हनुवटीवर लावावा. हा फेस लावल्यानंतर ब्लॅक हेड रिमुव्हल स्ट्रीप लावावी, व त्यावर परत एकदा अंड्याचा थर लावावा. एकूण दोन वेळा अंड्याचा व ब्लॅक हेड्स रिमुव्हल स्ट्रिप्सचा थर द्यावा. हे दोन्ही थर चाळीस मिनिटे राहू देऊन त्यानंतर काढून टाकावेत. ब्लॅक हेड रिमुव्हल स्ट्रिप्स कोणत्याही ब्युटी प्रोडक्ट्स मिळणाऱ्या स्टोअर मध्ये सहज उपलब्ध असतात.

Leave a Comment