फेसबूक आणि व्हॉट्सअॅपला मागे टाकत नव्या विक्रमाला टिक-टॉकची गवसणी


तरुणांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या टीक-टॉक या अॅपने एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. टीक-टॉक फेब्रुवारी 2020 मध्ये गूगल प्ले स्टोअरवर आणि अॅपल अॅप स्टोअरवर सर्वाधिक वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. सेन्सर टॉवरच्या अहवालानुसार उत्पन्न आणि इन्स्टॉल दोन्हींमध्ये या महिन्यात टीक-टॉकने बाजी मारली आहे. आता टीक-टॉक, व्हॉट्सअॅप आणि फेसबूकपेक्षा अशाप्रकारे अधिक लोकप्रिय ठरले आहे.

सेन्सरच्या अहवालानुसार टीक-टॉक अॅप मागील महिन्यात भारतात सर्वाधिक वेळा डाऊनलोड करण्यात आले. 4 कोटी 66 लाख एवढी भारतातील अॅप डाऊनलोडची संख्या आहे. हीच संख्या ब्राझीलमध्ये 97 लाख आणि अमेरिकेत 64 लाख आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये टीक-टॉकला गूगल प्ले स्टोअरवर जवळपास 9 कोटी 32 लाख वेळा इन्स्टॉल करण्यात आले. हे अॅप याआधी केवळ 1 कोटी 97 वेळा डाऊनलोड झाले होते. प्ले स्टोअर आणि अॅप स्टोअरवर टीक-टॉक आल्यानंतर एकूण 1.9 अब्ज वेळा इन्स्टॉल करण्यात आले होते.

टीक-टॉकसाठी फेब्रुवारी 2020 सर्वाधिक कमाई करुन देणारा महिना ठरला आहे. या महिन्यात टीक-टॉकने 5 कोटी 4 लाख डॉलरपेक्षा अधिकची कमाई केली आहे. यात चीनमधून सर्वाधिक कमाई झाली आहे. यानंतर अमेरिका आणि ब्रिटनमधून कमाई झाली. हे अॅप भारतात सर्वाधिक वेळा डाऊनलोड झाले असले तरी उत्पन्न देण्यात टॉपच्या देशांमध्ये भारताचा समावेश नाही.

Leave a Comment