मधुमेहाचा धोका टाळण्यासाठी


नव्या वर्षात आपण निरोगी राहण्याचा निर्धार करीत असाल तर त्या दृष्टीने काही पावले टाकावी लागतील आणि त्यातले पहिले पाऊल मधुमेहापासून सावध राहण्याबाबत असेल. कारण भारतात तरी मधुमेहापासून सात कोटी लोक बाधित असून या देशात या विकाराला एका साथीचे स्वरूप आले आहे. हा मधुमेह कसलाही इलाज न करता तसाच अंगावर राहू दिला तर त्यातून किडनी, हृद्रोग, तसेच अंधत्व असे आजार होऊ शकतात. तसा मधूमेहाचा धोका सगळ्या जगालाच आहे पण हा विकार जडण्याचे भारतीयांचे सरासरी वय हे यूरोपीय लोकांपेक्षा दहा वर्षांनी कमी आहे. शिवाय यूरोपीय देशातले या विकाराचे वाढीचे प्रमाण ५ ते ११ तर भारतातले प्रमाण १२ ते १८ टक्के आहे.

दक्षिण आशियातील आणि त्यातल्या त्यात भारतातील लोकांना मधुमेह होण्याची शक्यता जास्त आहे आणि त्यामागे जैविक, पर्यावरणीय, मानसिक, आर्थिक आणि आनुवंशिक कारणे आहेत. अशी शक्यता असल्यामुळेच भारतीयांनी मधुमेहापासून दूर राहण्याची दक्षताही आवर्जुन घेतली पाहिजे. व्यायाम, चांगला आहार, त्यात भाज्या आणि फळांचे जास्त प्रमाण, चरबीचे कमी प्रमाण, लठ्ठपणापासून सावध, तसेच वारंवार वैद्यकीय तपासणी या गोष्टी सांभाळल्या पाहिजेत. मधुमेह हा आनुवंशिक रोग असल्यामुळे तर ज्या घरात कोणालाही तो असेल त्या घरातल्या लोकांनी जास्त सावध राहण्याची गरज असते. वारंवार तेल, तूप, लोणी यांचे सेवन करणे आणि तळलेले पदार्थ खाणे या गोष्टी लोकांना वेगाने मधुमेहाकडे नेत असतात. तेव्हा बटाटावडा, कचोरी, सामोसा, भजे यांचे भक्षण करणे कटाक्षाने टाळले पाहिजे.

काही मानसिक घटकांचाही मधुमेहावर परिणाम होत असतो. निराशा आणि सततची चिंता या गोष्टी तर मधुमेहाला फार घातक असतात. वैवाहिक जीवन, नोकरी, समाजातले स्थान, उत्पन्नाचे स्वरूप यावर मधुमेह होणे किंवा न होणे अवलंबून असते. शिक्षणाने मधुमेहाबाबत जागरूकता निर्माण होते आणि शिकलेले लोक पूर्व काळजी घेतात. त्यामुळे उच्चशिक्षितांत प्रतिबंधात्मक उपाय योजिले जातात. तंबाखू, दारू यांचे व्यसन तर फार घातक असते. कारण या व्यसनांतून मानसिक आजार जडतात आणि त्यातून मधुमेह बळावतो. बिहारसारख्या मागासलेल्या राज्यातही या आजाराने चार टक्के लोक आजारी आहेत आणि १७ टक्के लोक अशा अवस्थेत आहेत की त्यांना कधीही या आजाराची बाधा होऊ शकते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment