हातावरील मेहेंदी उतरविण्यासाठी करा हे उपाय


लग्नसमारंभ किंवा इतर अनेक सणासुदीच्या निमित्ताने स्त्रिया हाता-पायांवर मेहेंदी लावीत असतात. आणि केवळ सणासुदीच्या वेळीच नाही, तर एरव्ही देखील आवड आहे म्हणून कित्येक मुली आपल्या हातांवर अगदी हौसेने मेहेंदी काढून घेताना दिसतात. पहिले तीन चार दिवस मेहेन्दीचा रंग सुरेख दिसतो. पण त्यानंतर मात्र एकदा मेहेन्दीचा रंग उतरण्यास सुरुवात झाली, की मग मात्र मेहेंदी कुठे हलकी, कुठे काळपट अशी काही तरी विचित्र दिसायला लागते. त्यावेळी, ही मेहेंदी हातावरून काढून टाकता आली तर बरे होईल, हा विचार प्रत्येकीच्या मनात डोकावतोच. तेव्हा हातावरची मेहेंदी उतरविण्यासाठी काही उपायांचा अवलंब करता येईल.

लिंबू उत्तम ब्लिचिंग एजंट आहे. त्यामुळे लिंबाचा रस हातांवर चोळल्यास मेहेन्दीचा रंग उतरविण्यास मदत होऊ शकते. या करिता एका लिंबाचे दोन भाग करून त्यामधील रस सरळ आपल्या हातांवर चोळावा. त्यानंतर लिंबाची साल देखील काही वेळ हातांवर घासावी. त्यानंतर कोमट पाण्याने हात स्वच्छ धुवून टाकावेत. आणखी एक उपाय म्हणजे जर पायांवर मेहेंदी असेल, तर अर्धी बादली कोमट पाण्यामध्ये पाच सहा चमचे लिंबाचा रस घाला, व त्या मिश्रणामध्ये पाय पंधरा मिनिटे बुडवून ठेवा. याने ही मेहेन्दीचा रंग उतरण्यास मदत होईल. हा उपाय दिवसातून दोन वेळा करावा.

हातांवर टूथपेस्ट चोळल्याने देखील मेहेन्दीचा रंग उतरतो. या करिता हातांवर किंवा पायांवरील मेहेन्दीवर टूथपेस्टचा एक पातळसा थर पसरावा. ही टूथपेस्ट सुकू द्यावी. त्यानंतर ही टूथपेस्ट चोळून काढून टाकावी आणि मग कोमट पाण्यामध्ये बुडविलेल्या टॉवेलने हात पाय स्वच्छ पुसून काढावेत. त्यानंतर हातांना व पायांना मॉईश्चरायझर लावावे. सलग दोन दिवस हा उपाय केल्याने हातांवरील किंवा पायांवरील मेहेंदी उतरून जाईल.

बेकिंग सोडा, म्हणजेच खाण्याचा सोडा हा देखील नैसर्गिक ब्लिचिंग एजंट आहे. मेहेन्दीचा रंग हातावरून उतरविण्यासाठी सम प्रमाणात सोडा आणि लिंबाचा रस मिसळून हे मिश्रण हातांवर लावावे. पाच मिनिटे हे मिश्रण हातावर ठेऊन त्यानंतर कोमट पाण्याने हात धुवून टाकावेत. मात्र हे मिश्रण हातांवर लावल्याने हात खरखरीत, कोरडे होऊ शकतात, त्यामुळे ह्याच्या वापरानंतर हातांवर किंवा पायांवर भरपूर मॉईश्चरायझर लावावे.

बाजारामध्ये जे खास अँटी बॅक्टेरियल साबण मिळतात, त्याने दिवसातून आठ ते दहा वेळेला हात धुतले तरी मेहेन्दीचा रंग हलका होण्यास मदत होते. मात्र सतत हात साबणाने धुवत राहिल्याने हातांवरील त्वचा खरखरीत होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक वेळी हात धुतल्यानंतर हातांवर मॉईश्चरायझर लावण्यास विसरू नये.

Leave a Comment