ब्युटी एक्स्पर्ट शेहनाझ हुसेन यांच्याकडून काही ब्युटी टिप्स


काही सण-समारंभ असोत, किंवा एखादी पार्टी असो, किंवा आपण घरीच जरी असलो, तरी आपण नेहमीच सुंदर दिसावे अशी इच्छा प्रत्येक स्त्रीची असते. तुमच्या सौंदर्याला जपण्यासाठी ब्युटी एक्स्पर्ट शेहनाझ हुसेन यांनी काही घरगुती टिप्स सांगितल्या आहेत. ह्या सर्व टिप्स त्यांनी स्वतः, त्यांच्या कैक वर्षांच्या अनुभवांनी पडताळून पहिल्या असल्याने संपूर्ण सुरक्षित आहेत.

चेहरा एक्स्फोलीएट करण्याकरिता, म्हणजेच चेहऱ्याच्या त्वचेवरील मृत पेशी हटविण्यासाठी दोन मोठ चमचे गव्हाचा कोंडा, एक मोठा चमचा बदामाची पूड, एक मोठा चमचा दही, एक चमचा मध, आणि गुलाबपाणी हे सर्व एकत्र करून त्याची पेस्ट तयार करावी. ही पेस्ट डोळ्यांच्या आणि ओठांच्या अवतीभोवतीची जागा सोडून बाकी सर्व चेहऱ्यावर लावावी. ही पेस्ट चेहऱ्यावर वीस मिनिटे लाऊन ठेवावी. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून टाकावा. तसेच चेहऱ्याची त्वचा मुलायम आणि चमकदार बनविण्यासाठी अंड्याच्या पांढऱ्या द्रवामध्ये थोडा मध मिसळून हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे. हे मिश्रण चेहऱ्यावर वीस मिनिटे लाऊन ठेऊन मग चेहरा धुवून टाकावा.
  
जर डोळ्यांना थकवा जाणवत असेल, तर कापसाचे बोळे गुलाब पाण्यामध्ये भिजवून घेऊन ही आय पॅडस्, डोळे बंद करून, डोळ्यांवर ठेवावीत. गुलाबपाणी सुकेपर्यंत हे कापसाचे बोळे डोळ्यांवर ठेवावेत. या मुळे डोळ्यांचा थकवा दूर होऊन डोळे तेजस्वी होतात. तसेच गुलाबपाण्याच्या मंद सुगंधाने मन शांत होण्यास मदत होते.

एक मोठा चमचा लिंबाचा रस, आणि एक मोठा चमचा मध एका अंड्यामध्ये घालून चांगले मिसळून घ्यावे. हे मिश्रण केसांना आणि केसांच्या मुळांशी लावावे. एक जाडसर टॉवेल गरम पाण्यामध्ये बुडवून घेऊन चांगला घट्ट पिळून घ्यावा. अंडे, मध आणि लिंबाच्या रसाचे मिश्रण केसांना लाऊन झाल्यानंतर गरम पाण्याचा टॉवेल केसांभोवती गुंडाळावा. वीस मिनिटांनंतर केस टॉवेल काढून टाकून केस नेहमीप्रमाणे धुवावेत. या उपायामुळे केस चमकदार होऊन जास्त दाट आणि मुलायम दिसू शकतात.

जर केस वारंवार शँपू वापरून देखील सतत तेलकट राहत असतील, तर केस शँपूने धुतल्यानंतर हेअर रिन्सचा वापर करावा. हे रिन्स बनविण्यासाठी थोड्या पाण्यामध्ये चहा उकळून घ्यावा. त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालावा. शँपू ने केस धुतल्यानंतर हे मिश्रण केसांवर ओतावे. या मुळे केसांचा तेलकटपणा जाऊन केस मुलायम आणि चमकदार होतील.

Leave a Comment