घरच्याघरीच तयार करा नॅचरल फ्लोअर क्लिनिंग प्रोडक्ट्स


आपले आणि आपल्या घरातील व्यक्तींचे स्वास्थ्य चांगले राहावे या करिता घराची साफसफाई ठेवणे अतिशय गरजेचे आहे. जिथे घाणीचे साम्राज्य आहे, तिथे निरनिराळे आजारही येतातच. पण आपले घर आणि घराच्या अवतीभोवतीचा परिसर जर स्वच्छ असेल, तर आजार आपल्या वाटेला येत नाहीत. घरामधील लहान मुळे तसेच वृद्ध मंडळी कोणत्याही इन्फेक्शन ने पटकन आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे घराची स्वच्छता ठेवणे अतिशय महत्वाचे आहे. विशेषतः जर घरामध्ये सतत पाहुण्यांचे येणेजाणे असेल, किंवा घरामध्ये पाळीव प्राणी असतील, तर स्वच्छतेकडे विशेष लक्ष पुरविणे अगत्याचे आहे. या करिता घरातील वस्तूंचे नियमित डस्टिंग, केर काढणे आणि फरशी पुसणे ही कामे नियमित होणे आवश्यक आहे.

फरशी पुसताना वापरण्यासाठी अनेक तऱ्हेची फ्लोअर क्लीनर्स आजकाल बाजारामध्ये उपलब्ध आहेत. या फ्लोअर क्लीनर्समध्ये निरनिराळ्या रसायनांचा वापर केलेला असतो. क्वचित प्रसंगी या रसायनांची अॅलर्जी होण्याचा धोका असतो. तसेच फिनाईल सारख्या फ्लोअर क्लीनर्स ने घरामधील पाळीव प्राण्यांना त्रास होऊ शकतो. बाजारातील फ्लोअर क्लीनर्स असतातही महाग. अश्या वेळी कोणतीही हानिकारक द्रव्ये किंवा रसायने न वापरता घरच्याघरी शंभर टक्के नॅचरल फ्लोअर क्लीनर्स तयार करता येऊ शकतात.

डस्टिंग करिता किंवा घरातील खिडक्या, टेबले आणि काचेच्या शोभेच्या वस्तू स्वछ करण्यासाठी आपण कॉलीन सारखे स्प्रे वापरतो. त्याऐवजी एका स्प्रे बॉटल मध्ये पाणी भरून घ्यावे, त्यामध्ये लिंबाच्या काही साली टाकाव्यात आणि त्यामध्ये व्हाईट व्हिनेगर घालावे. तीन भाग पाणी आणि एक भाग व्हिनेगर अश्या प्रमाणामध्ये हे मिश्रण तयार करायचे आहे. लिंबाच्या साली घातल्याने या मिश्रणाला सुगंध देखील मिळतो. हे मिश्रण काचेच्या वस्तू पुसण्यासाठी वापरावे. हेच मिश्रण फरशी पुसण्यासाठी देखील वापरले जाऊ शकते.

पावसाळा सुरु झाला किंवा ऋतू बदलत असताना सर्वत्र डासांचा आणि माश्यांचा प्रादुर्भाव होतो. घरामध्ये माश्या येऊ नयेत या करिता फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडे मीठ घालावे. या पाण्याने फरशी पुसल्याने घरामध्ये माश्या आणि डास होणार नाहीत. तसेच घरामध्ये मुंग्या होत असल्यास फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडे केरोसीन घालावे. यामुळे फरशी चमकदार दिसेलच, पण त्याशिवाय मुंग्या ही नाहीश्या होतील. बाथरूमच्या भिंतींवर पाण्याचे डाग पडत असतात. हे डाग घालाविण्याकरिता देखील पाणी आणि व्हिनेगर या मिश्रणाचा वापर करावा.

Leave a Comment