सरकार आता खाजगी बुकिंग एजेंट्सवर आणणार बंदी

सरकार रेल्वे प्रवाशांचे तिकिट बुकिंगसाठी खाजगी वेंडर आणि एजेंटची व्यवस्था बंद करण्याचा विचार करत असल्याचे, केंद्रीय रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी सांगितले. जर प्रवासी मोबाईल फोन आणि सर्व्हिस सेंटरद्वारे तिकिट बुक करू लागल्यास या एजेंट्सची गरज राहणार नाही, असे गोयल म्हणाले.

रेल्वे मंत्रालयातील अनुदानाच्या मागणी संदर्भातील लोकसभेतील चर्चेदरम्यान गोयल बोलत होते. ते म्हणाले की, सध्या सुरू असलेली वेंडर आणि एंजेट्सची पद्धत गरजेचे नसल्याचे मला वाटते. हे बंद करण्याचा विचार करत आहोत. आज सर्वांकडे मोबाईल असून, याद्वारे ते तिकिट बुक करू शकतात व ज्यांना मदत हवी आहे, ते थेट सर्व्हिस सेंटरवर जाऊन तिकिट बुक करू शकतात.

गोयल यांनी मंत्रालयाने बेकायदेशीर काम करणाऱ्या एजेंट्स आणि दलालांवर केलेली कारवाई देखील लक्षात आणून दिली. तिकिट बुकिंगसाठी बेकायदेशीर सॉफ्टवेअर विकणाऱ्या 104 जणांना आणि तिकिटांची ब्लॅकने विक्री करणाऱ्या 5,300 जणांना अटक केल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय 884 बुकिंग वेंडर्सला देखील ब्लॅकलिस्ट करण्यात आले आहे.

याशिवाय रेल्वेच्या 166 वर्षांच्या इतिहासत पहिल्यांदाच एखाद्या आर्थिक वर्षात एकाही रेल्वे प्रवाशाचा मृत्यू झाला नसल्याचे देखील त्यांनी सांगितले.

Leave a Comment