दुधाचे नियमित सेवन आरोग्यास हितकारक आहे का?


लहानपणापासून आपणा सर्वांना दररोज किमान एक ग्लास दुध पिण्याची सवय आपल्या आईने लावलेली आहे. कोणी आनंदाने, तर कोणी दुध आवडत नाही, तरी आईच्या आग्रहाखातर प्यावे लागते म्हणून दुध पीत असतो. दुध आपल्या आहाराचा अविभाज्य भाग आहे. दुधाच्या नियमित सेवानाने आरोग्य चांगले राहते अशी मान्यता आहे. पण हृदयरोग होण्याची शकयता, लठ्ठपणा इत्यादी विकार दुधाच्या सेवनाने होतात असे ही काहींचे म्हणणे आहे. त्यामुळे आपल्या आहारातील महत्वपूर्ण घटक असलेल्या दुधाचे नियमित सेवन योग्य आहे किंवा नाही ह्याचा विचार करणे अगत्याचे ठरत आहे. याबाबतीत आहारतज्ञांची मते विचारात घेणे योग्य ठरेल.

आहारतज्ञांच्या मते दुध हा पूर्ण आहार आहे. तसेच दुध अतिशय पौष्टिक असून त्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, अ, बी१२ आणि रिबोफ्लाविन ही जीवनसत्वे, आणि पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, झिंक हे क्षार आहेत. ही सर्व पोषक तत्वे दुधामध्ये आहेत. मात्र दुधामध्ये लोह आणि क जीवनसत्व ही दोन पोषक तत्वे नाहीत. त्यामुळे लोह आणि क जीवनसत्व असलेले इतर अन्नपदार्थ दुधाच्या जोडीने आपल्या आहारामध्ये समाविष्ट करावेत. अन्यथा लोहाच्या कमतरतेमुळे अनिमिया होऊ शकतो.

सकाळच्या नाष्ट्यामध्ये केवळ एक ग्लास दुध पिणे पुरसे आहे ही समजूत चुकीची आहे. सकाळचा नाश्ता हा आपल्या दिवसभरातील अन्नसेवानाचा एक मुख्य भाग आहे. त्याद्वारे आपल्या शरीराला मिळणारी ऊर्जा आपल्याला दिवसभराच्या कामासाठी ताकद देत असते. त्यामुळे या वेळी आपल्या आहारात कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्वे, आणि फायबर या सर्व पोषक तत्वांचा समावेश असणे आवश्यक आहे. त्यामुळे ही सर्व पोषक द्रव्ये आपल्याला मिळतील असा नाश्ता दुधाच्या जोडीने घ्याला हवा. तसेच रात्रभराच्या झोपेनंतर शरीराला काही प्रमाणात ग्लुकोजची एखील आवश्यकता असते. त्यामुळे दुध, त्याच्या जोडीला कॉर्न फ्लेक्स, किंवा ओट्स, एखादे फळ असा नाश्ता दिवसाला सुरुवात करताना असायला हवा.

दुधामध्ये हाडांच्या व दातांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम असते. पण दुधाखेरीज इतर अनेक पदार्थ असे आहेत ज्यांच्यामध्ये दुधाइतकेच किंवा त्याहीपेक्षा जास्त मात्रेमध्ये कॅल्शियम असते. पांढरे तीळ, नाचणी, राजमा आणि सोयाबीन हे पदार्थ कॅल्शियमचे उत्तम स्रोत आहेत. शंभर ग्राम पांढऱ्या तीळामध्ये सुमारे १३०० ते १४०० मिलीग्राम कॅल्शियम आहे, तर शंभर मिलीलीटर दुधामध्ये केवळ २०० ते ३०० मिलीग्राम कॅल्शियम आहे. त्यामुळे शरीराची कॅल्शियमची गरज पूर्ण करण्यासाठी केवळ दूधच गरजेचे आहे असे नाही. त्यामुळे ज्यांना दुध आवडत नाही, त्या व्यक्तींनी कॅल्शियम साठी आपल्या आहारामध्ये तीळ, नाचणी इत्यादी पदार्थांचा समावेश करावा.

घरामध्ये लहान मुलांपासून ते वृद्ध मंडळींपर्यंत सर्वांनी नियमित दुध प्यायलाच हवे, असा आग्रह सोडायला हवा. वयाच्या बाराव्या वर्षानंतर दुध पिण्याला इतर पर्यायही उपलब्ध करून द्यायला हवेत. दुधाशिवाय सुका मेवा, तीळ, नाचणी इत्यादी पदार्थांचा आहारामध्ये नियमित समावेश करायला हवा. या मुळे शरीराला आवश्यक ते पोषक घटक मिळतीलच, शिवाय शरीराची रोगप्रतिकारशक्ती देखील चांगली राहील. सुक्या मेव्यामध्ये दुधापेक्षा प्रथिने अधिक आहेत, तर तीळामध्ये दुधापेक्षा अधिक मात्रेमध्ये कॅल्शियम आहे.

वाढत्या वयामध्ये दूध प्याल्याने अपचन, पोट फुगणे, पोट बिघडणे अश्या तक्रारी उद्भवू शकतात. यालाच लॅक्टोज ईनटॉलरन्स असे म्हटले जाते. पण पुष्कळदा उद्भविणारे हे त्रास दुधामुळे उद्भवत आहेत, हे लक्षात यायलाच वेळ लागतो. पण एकदा ही गोष्ट लक्षात आली, की दुधाचे सेवन थांबविले जाते, आणि त्याचबरोबर हे त्रास ही थांबतात. त्यामुळे पोषणासाठी केवळ दुधावर अवलंबून न राहता, आपला आहार चौरस असेल त्याची काळजी घ्यावी.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment