डेटिंग अॅप्स वापरताना घ्या ही खबरदारी


आजकालची तरुण पिढी ‘डेट’ करण्यासाठी निरनिराळ्या डेटिंग अॅप्सचा वापर करताना आढळते. मात्र एका जागतिक स्तरावरील सायबर सेक्युरिटी कंपनीच्या मते सध्या अधिकाधिक प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या कोणतीही डेटिंग अॅप्स किंवा साईट्स पूर्णतया सुरक्षित नाहीत. ही अॅप वापरणाऱ्या व्यक्तींची लोकेशन डीटेल्स, नावे, आणि इतर संवेदनशील डेटा सुरक्षित असेलच याची कोणतीही खात्री देता येत नाही. त्यामुळे ह्या अॅपवर तुम्ही देत असेली तुमची खासगी माहिती खासगी राहीलच याची शाश्वती नाही. म्हणून अश्या अॅप्स चा वापर करताना स्वतःच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेणे आवश्यक आहे.

एखाद्या अॅपच्या माध्यमातून आपली व्यक्तिगत माहिती शेअर करताना काळजी घ्या. आपल्याबद्दल सर्व माहिती शेअर करणे टाळा. बहुतेक युजर्स आपले संपूर्ण नाव साईटवर शेअर करतात. असे न करता शक्यतो फक्त नाव, किंवा काल्पनिक नाव शेअर करणे चांगले. आपला मोबाईल नंबर शक्यतो शेअर करणे टाळा. तसेच आपली कोणत्याही प्रकारची व्यक्तिगत माहिती देण्याआधी त्या साईटच्या माध्यमातून तुम्ही ‘डेट’ करणार असलेल्या व्यक्तीबद्दल खात्री करून घ्या. तुमच्या आवडीनिवडी, तुमच्या परिवारातील सदस्यांबद्दल माहिती, किंवा तुमची नेहमीची ये-जा असणारी ठिकाणी याबद्दल माहिती देण्याचे टाळा. तुम्ही ‘डेट’ करणार असलेल्या व्यक्तीबद्दल ऑनलाईन माहिती काढून त्या व्यक्तीला ओळखणारे तुमचे कोणी ‘ कॉमन ‘ मित्र-मैत्रिणी आहेत का याचा शोध घ्या. जर व्यक्ती पूर्णतया अनोळखी असेल, तर ‘डेट ‘ करणे शकयतो टाळा.

डेटिंग करिता ज्या अॅपचा किंवा साईटचा वापर तुम्ही करणार असाल, त्याबद्दल आधी खात्री करून घ्या. त्यासंबंधी आपल्या मित्रपरिवाराचा सल्ला उपयोगी पडू शकतो. ऑनलाईन सर्फिंग करीत असताना अनेक डेटिंग अॅप्स किंवा साईट्स चे ‘पॉप अप्स’ येत असतात. हे पॉप अप्स पाहून त्यावर लगेच क्लिक करू नका. डेटिंग साठी अनेक साईट्स व अॅप्स उपलब्ध आहेत. त्यांच्यापैकी कोणत्याही डेटिंग साईट किंवा अॅपची निवड करण्याआधी त्याबद्दल लोकांचे ‘ फीडबॅक ‘ जाणून घेण्यास विसरू नये.

डेटिंग साईट्सचा किंवा अॅप्स चा वापर करीत असताना आपली स्वतःची कोणत्याही प्रकारची व्हिडियो रेकॉर्डींग्ज अपलोड करणे टाळा. तसेच डेटिंग साईट्सवर ‘लाईव्ह’ चॅट देखील आवर्जून टाळा. तुमचे लोकेशन किंवा तत्सम इतर व्यक्तिगत माहिती समोरच्याला मिळेल असे कोणत्याही प्रकारचे व्हिडियो वेब कॅमेरा द्वारे पाठवू नका. तसेच अश्या प्रकारच्या साईट्स किंवा अॅप साठी वेगळा ई मेल आय डी तयार करा. आपला व्यक्तिगत ई मेल आई डी देण्याचे टाळा. तसेच डेटिंग साईट्स साठी तयार केलेल्या ई मेल आय डी वर आपला फोन नंबर, किंवा पत्ता देऊ नका. तुम्हाला ऑनलाईन भेटलेल्या व्यक्तीशी संभाषण साधण्याची इच्छा असेल, तर ऑनलाईन ‘ व्हॉईस कॉल ‘ ची सुविधा असणाऱ्या साईट्स निवडा. समोरची व्यक्ती तुमच्याबद्दल अधिक जाणून घेण्यास उत्सुक असली तरी आपली व्यक्तिगत माहिती देणे टाळा.

Leave a Comment