अंबानी, अझीम नुकसानीत पण दमाणी फायद्यात


फोटो सौजन्य ट्रेड ब्रेन
करोनामुळे शेअर बाजार कोसळला असून तमाम बडे उद्योगपती लाखो कोट्यवधीचे नुकसान सोसत आहेत मात्र भारतात एक उद्योगपती या काळातही फायद्यात आहेत. सुपरमार्केट चेन डी मार्टचे संस्थापक या कठीण परिस्थितीत सुद्धा फायद्यात असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले आहे. राधाकिशन दमाणी यांची शुक्रवारी शेअर बाजार बंद झाल्यावरची संपत्ती १०.१० अब्ज डॉलर्स होती. गेल्या वर्षात त्यांच्या संपत्तीत २९०० कोटींची वाढ झाली आहे असे समजते.

शेअर बाजारात डी मार्टच्या शेअरला अजूनही चांगली मागणी आहे त्यामुळे त्याचे दर चढे आहेत. आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांच्या रिलायंस शेअरचा दर घसरल्याने त्यांची संपत्ती १९ अब्ज डॉलर्सने कमी झाली परिणामी ते आता आशियातील श्रीमंत व्यक्ती राहिलेले नाहीत. हा मान आता अलीबाबाच्या जॅक मा यांच्याकडे गेला आहे. नुकसानीच्या बाबतीत अंबानी जगात पाचव्या क्रमांकावर आहेत. करोना मुळे कच्च्या तेलाचे दर घसरल्याचा फटाका रिलायंसला बसला आहे. शुक्रवारी अंबानी यांची संपत्ती ४० अब्ज डॉलर्सवर आली.

विप्रोचे अझीम प्रेमजी यांच्या संपत्तीत याच कारणामुळे ३.२३ अब्ज डॉलर्सची घट झाली तर उदय कोटक यांची संपत्ती २.४१ अब्ज डॉलर्सनी कमी झाली. लक्ष्मी मित्तल यांची संपत्ती ४.५३ अब्ज डॉलर्सने घटली तर शेअर बाजारात गुंतवणूक केलेल्यंचे ४६ लाख कोटी बुडाले आहेत.

Leave a Comment