माझ्या ‘त्या’ घोषणांमुळेच महाराष्ट्रात कोरोनाचे कमी रुग्ण


मुंबई – चीनमधील हजारो नागरिकांचा बळी घेतल्यानंतर जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने भारतात पहिला बळी घेतला आहे. कर्नाटकमध्ये दोन दिवसांपूर्वी उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या वृद्धास कोरोनाची लागण झाली होती, असे गुरुवारी स्पष्ट झाले.

दरम्यान, पुणे, मुंबईपाठोपाठ ठाण्यातही कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. कोरोनाची मुंबई आणि ठाण्यात प्रत्येकी एकास लागण झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाल्याने महाराष्ट्रातील रुग्णसंख्या १४ वर पोहोचली. तर कोरोनाबाधितांची देशातील संख्या ७७ वर पोहोचली आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये कोरोनाचा फैलाव सुरु झाल्याच्या पार्श्वभूमीवर कोरोनासंदर्भातील जनजागृतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका प्रचारफेरीमध्ये ‘गो कोरोना… गो… गो कोरोना…’ अशी घोषणाबाजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली होती. त्यावरुन त्यांच्यावर नेटकऱ्यांनी टीकाही केली होती. पण आता ‘गो कोरोना… गो… गो कोरोना…’ अशी घोषणाबाजी मी केल्यानंतर महाराष्ट्रातील कोरोनाचे कमी रुग्ण सापडल्याचे वक्तव्यही आठवले यांनी केले आहे.

देशभरामध्ये कोरोनाबद्दल भितीचे वातावरण असून सर्व उपाययोजना सरकारने केल्या असल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असे सरकारी यंत्रणांकडून स्पष्ट केले जाते आहे. असे असतानाच आठवलेंचा एका व्हिडिओ काही दिवसांपू्र्वी व्हायरल झाला होता. चीनी नागरिकांनी मुंबईमध्ये आयोजित केलेल्या प्रचारफेरीमध्ये आठवले सहभागी झाले होते.

यावेळेस चीनचे भारतातील काऊन्सील जनरल तांग गुइलाई हेही उपस्थित होते. आंदोलनाच्या ठिकाणी आठवले आल्यानंतर त्यांनी भारत चीन संबंध सुदृढ राहोत असे म्हटले आणि ‘गो कोरोना… गो… गो कोरोना… गो’ अशा घोषणा देऊ लागले. आठवले यांना घोषणा देताना बघून उपस्थितांनाही हुरूप आला आणि परदेशी नागरिकांनीही ‘गो कोरोना’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला.

गो कोरोना असे मी म्हटल्यामुळे महाराष्ट्र काय तर भारतामध्येही तो जास्त पसरलेला नाही. तरीही यासंदर्भात सरकारकडून काळजी घेतली जात आहे. कोरोनाला आम्ही जायला सांगितले आहे. पण तो होऊ नये यासंदर्भातील काळजी घेणे आपली जबाबदारी आहे. आपल्या गावामध्ये, आपल्यामध्ये कोरोना येता कामा नये यासाठी आपणही काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

Leave a Comment