सायबर सेल बंद करु शकत नाही टीक-टॉक अकाऊंट

काही महिन्यांपुर्वी सामाजिक तेढ निर्माण केल्याचा आरोप करत फैसल शेख, शादान फारुकी आणि हसनैन खान या तीन युवकांचे शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप टीक-टॉक अकाउंट मुंबईच्या सायबर सेलने ब्लॉक केले होते. मात्र आता या तिघांनाही मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.

उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, सायबर सेलकडे या युवकांचे टीकटॉक अकाउंट बंद करण्याचा कोणताही अधिकार नाही. मागील आठवड्यात न्यायालयाच्या निर्णयानंतर या तिघांच्याही टिकटॉक अकाउंटवरील बंदी हटवण्यात आली आहे.

फैसल शेख, शादान फारुकी आणि हसनैन खान या तिघांवर टिकटॉक व्हिडीओच्या माध्यमातून सामाजिक तेढ निर्माण केल्याचा आरोप होता. या संबंधी तक्रारीनंतर मागील वर्षी जुलै महिन्यात मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने त्यांचे टीकटॉक अकाउंट ब्लॉक केले होते.

मागील वर्षी ऑगस्टमध्ये त्यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळाला होता. मात्र अकाउंटवरील बंदी हटवण्यात आली नव्हती. मागील आठवड्यात त्यांच्या अकाउंटवरील बंदी हटवताना न्यायालयाने म्हटले की, टीकटॉक अकाउंट बंद करण्याचा सायबर सेलकडे कोणताही अधिकार नाही.

Leave a Comment