पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले 3 कोरोनाग्रस्त


पुणे : पिपंरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरातील पाच संशयित कोरोना रुग्णांपैकी तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती दिली. अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे पुणे जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता १५ वर पोहोचली आहे. दरम्यान, नागरिकांनी घाबरून न जाता वैयक्तिक आरोग्याची काळजी घ्यावी. साबणाने वारंवार हात धुवावेत, हस्तांदोलन करु नये आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा वैद्यकीय विभाग कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. विलगीकरण कक्ष वायसीएममध्ये उभारण्यात आला असून तो सज्ज केला आहे. तर सात खासगी रुग्णालयात ४८ आयसोलेशन बेड उपलब्ध केले आहे. महापालिका कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सक्षम असून, नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली आहे.

पुण्यातील राष्ट्रीय प्रयोग शाळेत तपासणीसाठी वायसीएममध्ये दाखल केल्या गेलेल्या पाच जणांच्या घशातील द्रवाचे नमुने पाठविले होते. त्यापैकी तीन जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. दुबईला पुण्यातून जे प्रवाशी गेले होते. त्यापैकी हे प्रवासी आहेत. दुबईतून परत आल्यानंतर विमानतळावरुन टॅक्सीने थेट हे प्रवासी घरी परतले होते. दरम्यान, ज्या टॅक्सीतून हे परतले त्या टॅक्सी चालकालाही कोरोनाची बाधा झाली आहे. तो मुंबईचा आहे. मुंबईतही आज आणखी एक रुग्ण आढळून आला आहे.

Leave a Comment