करोनामुळे चिकनला मंदी तर फणसाची चांदी


फोटो सौजन्य यु ट्यूब
कुठल्या वस्तूला कोणती परिस्थिती लाभदायक ठरेल हे सांगता येणे अवघड आहे. आता हेच पहा. जगभर फैलावत चाललेल्या करोनाची भारतात एन्ट्री झाली आणि या विषाणूचा प्रसार प्राण्यांच्या मांसामधून होत असल्याची बातमी आल्याबरोबर भारतीयांनी चिकन, मटन आहारातून बाद करून टाकले. याचा प्रचंड फटका चिकन मटन विक्रेत्यांना, पोल्ट्री उद्योगाला बसला. अनेक ठिकाणी जिवंत कोंबड्या आणि पिले जमिनीत जिवंत गाडली गेली. चिकनचे दर एकदम घसरले आणि डाळीपेक्षा चिकन स्वस्त झाले. अनेक नेत्यांनी चिकन मुळे करोना होत नाही याची स्वतः सर्वांसमोर चिकन खाऊन प्रात्यक्षिके दिली पण लोकांच्या मनात बसलेली भीती दूर झालेली नाही.


चिकनचे भाव एकीकडे गडगडले असताना लोकांनी चिकनला दुसरा पर्याय निवडला तो फणसाचा. यामुळे एरवी ५० रुपये किलोने मिळणारा फणस आता चक्क १२० रुपये किलोवर गेला आहे. परिणामी फणस उत्पादक आणि विक्रेते यांच्यासाठी करोना लाभदायक ठरल्याचे दिसून येत आहे. फणसाचा वापर बिर्याणी साठी मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. शिजलेला फणस दिसायला चिकन प्रमाणे आणि स्वादालाही तसाच लागतो. शिवाय तो अनेक आजारांपासून संरक्षण देणारा आहे.

फणसात क, ई आणि के ही जीवनसत्वे मुबलक प्रमाणात आहेत. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. फणस रक्तक्षय कमी करतो. त्यातील कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मुळे हाडे बळकट होतोत आणि मुख्यत्वे फणस फ्ल्यू पासून संरक्षण करतो असे म्हटले जाते त्यामुळे तो करोना पासूनही संरक्षण देऊ शकेल असे सांगितले जात आहे. सध्या फणसाचा सिझन जोरात आहे. एरवी सिझनला बाजारात मोठ्या प्रमाणावर फणस येतो त्यामुळे त्याचे दर पडलेले असतात. यंदा मात्र उलट परिस्थिती दिसत असून फणसाचा खप प्रचंड वाढल्याचे दृश्य आहे.

Leave a Comment