परदेशी खेळाडूविना खेळवली जाऊ शकतो यंदाचा आयपीएल


नवी दिल्ली – आता यंदाच्या आयपीएल स्पर्धेलाही भारतात पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचा फटका बसायला सुरुवात झाली असून केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून परदेशी नागरिकांच्या व्हिसा नियमांमध्ये बदल केला आहे. भारतात १५ एप्रिलपर्यंत परदेशी नागरिकांना येण्यास मज्जाव करण्यात आल्यामुळे १५ एप्रिलपर्यंत परदेशी खेळाडू आयपीएलमध्ये खेळू शकणार नसल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली.

दरम्यान आयपीएलचे सामने पुढे ढकलावे यासाठी अनेक राज्यांनी केंद्राला विनंती केली आहे. १४ मार्चला कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलची बैठक होणार आहे. आयपीएलच्या भवितव्याबद्दलचा निर्णय या बैठकीत घेण्यात येणार आहे.

गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून असून सध्याच्या घडीला रणजी चषक, अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड, इंग्लंड विरुद्ध श्रीलंका, ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड हे सर्व सामने ठरलेल्या वेळापत्रकानुसार होत आहेत. मुंबईत लोकल ट्रेन सुरु आहेत, शाळा-कॉलेज पूर्णपणे ठप्प झालेले नाही. आरोग्य मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आलेले सर्व उपाय आम्ही राबवत आहोत. पण १४ तारखेच्या बैठकीत या सर्व गोष्टींवर अंतिम निर्णय होईल, अशी माहिती दिली.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयात आयपीएल सामन्यांचे आयोजन पुढे ढकलण्यात यावे यासाठी याचिकाही दाखल करण्यात आलेली होती. पण यावर त्वरित सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला असून ही याचिका १६ मार्च रोजी सुनावणीसाठी येणार आहे.

व्हिसाचे नियम आंतरराष्ट्रीय संघटनांचे पदाधिकारी, परदेशांचे राजदूत आणि काही महत्वाच्या व्यक्तींना लागू नसतील. भारतात चीन, इटली, इराण, कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या सात देशांमधून येणाऱ्या परदेशी नागरिकांना १५ एप्रिलपर्यंत भारतात येता येणार नाही, त्याचबरोबर या देशांमधून मायदेशी परतणाऱ्या भारतीय व्यक्तींचीही कडक चौकशी केली जाणार असल्यामुळे आगामी काळात गव्हर्निंग काऊन्सिल आयपीएल आणि परदेशी खेळाडूंच्या सहभागाबद्दल नेमका काय निर्णय होतो हे १४ तारखेच्या बैठकीतच कळेल.

Leave a Comment