ज्योतिरादित्य सिंधिया आहेत ३७४ कोटींचे मालक


कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपच्या पदराखाली आलेले ज्योतिरादित्य सिंधिया ग्वाल्हेरच्या राजघराण्यातील आहेत. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार ते ३७४ कोटींचे मालक आहेत आणि त्यांच्यावर एकाही गुन्हेगारी खटला दाखल नाही. स्वच्छ प्रतिमेच्या अगदी मोजक्या नेत्यांच्या यादीतील सिंधिया हे एक नेते आहेत.

ज्योतिरादित्य यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेले प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर आहे. त्यानुसार ज्योतिरादित्य ३,७४,५६,१८,७४५ रुपये संपत्तीचे मालक आहेत. त्यांच्या ४० एकर परिसरात असलेल्या जयविलास महालाची बाजार किंमत १८० कोटी आहे. महाराष्ट्राच्या श्रीगोंदा मध्ये त्यांची २० एकर व लीम्बनमध्ये ५३ एकर शेतजमीन आहे. त्यांची किंमत १ कोटी रुपये आहे. निवासी मालमत्ता १४७ कोटींची असून त्यात समुद्र महाल, राणी महाल, हिरनावन कोठी, शांती निकेतन, छोटी विश्रांती, विजयभवन, पिकनिक स्पॉट, घंटीघर, तबेलाआणि रोशनी घर यांचा समावेश आहे.

यातील समुद्र महालची किंमत ३१ कोटी असून राणी महालची किंमत २६ कोटी आहे. याशिवाय त्यांच्याकडे खानदानी दागदागिने आहेत. त्यांची किंमत ११ कोटी असून त्यात २०६६ ग्राम सोने व ७२८ किलो चांदी आहे. ज्योदिरादित्य यांनी गुंतवणुकीसाठी फिक्स डिपोझीटला प्राधान्य दिले असून त्यांच्याकडे २२ कोटींच्या एफडी आहेत आणि १० कोटी त्यांनी म्युच्युअल फंड मध्ये गुंतविले आहेत.

Leave a Comment