तीन दिवस बंद राहणार पुण्यातील दोन शाळा


पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला असून यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या भीतीमुळे पुण्यामधील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. नांदेड सिटीतील दोन शाळांना सुट्टी देण्यात आली असून तीन दिवस या दोन शाळा बंद राहणार आहेत. हा निर्णय खबरदारीचा उपाय म्हणून घेण्यात आला आहे. हे पाऊल कोरोनाचा फैलाव होऊ नये याकरिता शाळा व्यवस्थापनाने उचलले आहे.

मंगळवारी मुंबई महापालिकेने कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या पुण्यातील ‘त्या’ कुटुंबासोबत विमानातून प्रवास केलेल्या मुंबईतील सहा प्रवाशांचा शोध घेतला. त्या सर्वांना खबरदारीचा उपाय म्हणून कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे मेडीकल रिपोर्ट आज येणे अपेक्षित आहे.

एका खासगी ट्रॅव्हल कंपनीसह पुण्यातील कुटुंब दुबईला फिरायला गेले होते. कोरोनाची त्यांना बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्याशी संपर्क झालेल्यांचाही शोध घेण्यात आला. यापैकी सहा जण मुंबईतील असल्याचे समोर आल्याने त्यांनाही तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, दुबईला गेलेले कुटुंब भारतात परतल्यानंतर ते टॅक्सीने पुण्यात गेले. ज्या टॅक्सीने गेले त्या टॅक्सी चालकालाही कोरोनाची बाधा झाली.

Leave a Comment