पुण्यात आणखी दोघांना कोरोनाची लागण, रुग्णांची संख्या पाचवर


पुणे – दुबई येथून परत आलेल्या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी निष्पन्न झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून या रुग्णाची मुलगी आणि त्यांना घेऊन येणारा वाहनचालक या दोघांची तपासणी करण्यात आली असून, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाचे एकूण 5 रुग्ण झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे.

दरम्यान, पुण्यात सोमवारी कोरोनाचे दोन रुग्ण आढळल्यानंतर सर्व विभागाच्या जिल्हा प्रशासनाने तातडीने बैठका घेत खबरदारी बाळगण्याच्या सूचना दिल्या होत्या. पुण्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची ओळख पटविण्यासाठी पाच टीम तयार करण्यात आल्या आहेत. आरोग्य, पोलीस आणि महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचा या टीममध्ये समावेश आहे.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर पुण्यात उपचार करण्यासाठी २०७ खाटा तयार ठेवण्यात आल्या आहेत. जे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत त्यांची नावे, राहण्याचे ठिकाण, जिथे काम करतात ती ठिकाणे उघड करू नयेत. त्याची माहिती देवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Leave a Comment