सोशल मीडियात व्हायरल होत असलेला पुण्यात कॉलेजला सुट्टी असल्याचा मेसेज खोटा


पुणे – सध्या सोशल मीडियावर पुण्यातील महाविद्यालयांना कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर २० ते ३० मार्च सुट्टी देण्यात आल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. पण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने हा मेसेज खोटा असल्याचे स्पष्ट केले. अशी कोणतीही सूचना विद्यापीठाकडून देण्यात आलेली नाही. हा मेसेज कोणीतरी खोडसाळपणे सोशल मीडियांमध्ये व्हायरल केल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.

पुण्यामध्ये कोरोनाची लागण झालेले पाच रुग्ण आढळून आल्यामुळे आता खबरदारीचे उपाय म्हणून काही निर्णय घेण्यात येत आहेत. या आठवड्यात पुण्याच्या दक्षिण भागातील काही शाळांनी सुट्टी जाहीर केली आहे. तर काही कंपन्यांनीही कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा दिली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनामुळे पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या महाविद्यालयाना २० ते ३० मार्च या कालावधीत सुट्टी देण्यात आल्याचा मेसेज सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला होता. पण विद्यापीठाच्या कुलसचिवांनी बुधवारी सकाळी हा संदेश चुकीचा असल्याचे स्पष्ट केले. चुकीचा संदेश कोणी तयार केले, त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाने दिली.

Leave a Comment