सिंधियांना राज्यसभा सदस्यत्वासह मोदी सरकारमध्ये मिळणार मंत्रीपद !


भोपाळ – मध्य प्रदेशात आलेल्या राजकीय भूकंपानंतर अखेर आज दुपारी 12.30 वाजता भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत ज्योतिरादित्य सिंधिया भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. याच दरम्यान, आता त्यांच्या भाजप प्रवेशाला सिंधिया समर्थकांचा एक वर्ग विरोध करताना दिसून येत आहे. भाजपमध्ये प्रवेश न करता सिंधिया यांनी स्वतःचा वेगळा राजकीय पक्ष स्थापित करावा अशी मागणी ग्वाल्हेर येथील कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

मंगळवारी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा सिंधिया यांनी राजीनामा दिला. त्यांना भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता राज्यसभेत पाठवून केंद्रात मंत्रिपद दिले जाणार अशी शक्यता आहे. बुधवारी यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. सिंधिया यांच्या राजीनाम्याचे वृत्त समोर येताच मध्य प्रदेशात कमलनाथ यांच्या सरकारमधील 6 मंत्र्यांसह 22 आमदारांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यापैकी 5 ते 7 आमदारांना मध्य प्रदेशात भाजपची सत्ता स्थापित झाल्यानंतर मंत्रिपद दिले जाणार असे सुत्रांकडून समजते.

भाजपने मध्य प्रदेशातील वाढत्या राजकीय हालचाली पाहता आपल्या 105 आमदारांना भोपाळमधून इतरत्र रवाना केले आहे. त्यामध्ये 8-8 आमदारांचे गट तयार करण्यात आले आहेत. या प्रत्येक गटातील एकाला ग्रुप लीडर करण्यात आले. हाच नेता आपल्या गटातील आमदारांवर नजर ठेवणार आहे. वेग-वेगळ्या वाहनांमध्ये या सर्वच गटांना दिल्ली, मानेसर आणि गुडगाव अशा विविध ठिकाणी पाठवण्यात आले आहे. तर दुसरीकडे, बुधवारी सिंधिया समर्थक आमदार बंगळुरू येथून आणले जातील. मध्य प्रदेश विधानसभेत अविश्वास ठराव मांडण्यात आला तेव्हाच या आमदारांना भोपाळला नेले जाणार आहे. अन्यथा राज्यसभा निवडणुकीच्या वेळी अर्थात 26 मार्च रोजी भोपाळला बोलावले जाईल. सोबतच, भोपाळच्या बड्या नेत्यांचे दिल्ली दौरे अचानक वाढले आहेत. केंद्रीय मंत्री प्रह्लाद पटेल आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय सुद्धा दिल्ली दौऱ्यावर आहेत.

Leave a Comment