मुंबई – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मध्य प्रदेशपाठोपाठ आता महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप होईल असे भाकित वर्तवले आहे. महाविकासआघाडीत उद्धव ठाकरे नाराज असून ते लवकरच परत येतील आणि राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होईल असा दावाही रामदास आठवले यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्रास देत असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला. त्याचबरोबर उद्धव ठाकरे परत आले नाहीत तरी भाजपमध्ये त्यांचे आमदार येतील असेही त्यांनी म्हटले आहे.
मध्य प्रदेशपाठोपाठ महाराष्ट्रातही होणार सत्तांतर – रामदास आठवले
रामदास आठवले यांनी मध्य प्रदेशातील राजकीय घडामोडींवर बोलताना सांगितले की, मध्य प्रदेशाप्रमाणे छत्तीसगड, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्येही बदल होतील. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार महाराष्ट्रातही येऊ शकते.
उद्धव ठाकरेंना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेरले असून ते प्रचंड काळजीत आहेत. निर्णय घेताना उद्धव ठाकरेंना अडचणी येत असल्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा परत येतील असे मला वाटते. उद्धव ठाकरे परत आले नाहीत तरी त्यांचे आमदार आमच्यासोबत येतील. त्यामुळे भविष्यात महायुतीचे सरकार येण्याची शक्यता असल्याचा दावा रामदास आठवले यांनी केला आहे.