भाजपमध्ये प्रवेश करताचा काँग्रेसवर ज्योतिरादित्य शिंदेंची टीका


नवी दिल्ली: मध्य प्रदेशात राजकीय धुळवड खेळत काँग्रेसच्या नावाने बोंबा मारत दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, मंत्री धर्मेंद्र प्रधान, उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे भाजप मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला उपस्थित होते. उद्या ज्योतिरादित्य शिंदे भोपाळला जाणार असून १३ मार्चला ते राज्यसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या येण्याने आम्हाला आनंद होत असून त्यांना पक्षात मुख्य प्रवाहात काम करण्याची संधी मिळेल असे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले.

जोतिरादित्य शिंदे यांचे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पक्षात स्वागत केल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना ज्योतिरादित्य यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली. नव्या नेतृत्वाला आता काँग्रेस पक्षात संधी मिळत नाही. काँग्रेस पक्ष आता पूर्वीसारखा राहिलेला नसल्याचे सांगत, हा पक्ष आता सत्यापासून दूर पळू लागला असल्याची टीका ज्योतिरादित्य यांनी केली आहे.

Leave a Comment