ब्रिटनच्या आरोग्य मंत्र्यांनाच झाली कोरोनाची लागण


चीनसोबतच जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे. त्यातच आता केवळ सामान्य नागरिकच नव्हे तर आरोग्य मंत्र्यालाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. कोरोना व्हायरसची लागण ब्रिटनच्या आरोग्य मंत्री नदीन डॉरिस यांनादेखील झाली आहे. संपूर्ण देशात संसर्ग रोखण्यासाठी काम करणाऱ्या आरोग्यमंत्र्यांलाच कोरोनाची लागण झाल्याने यासंबंधी अधिक तपास सुरु आहे.

एक निवेदन ब्रिटीश खासदार आणि आरोग्य विभाग मंत्री नदीन डॉरिस यांनी जाहीर करत, आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले आहे. कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याचे त्यांच्या टेस्ट रिपोर्टमध्ये दाखवण्यात आले आहे. ६२ वर्षीय आरोग्य मंत्र्यांनी कोरोनाची लागण झाल्यानंतर आपल्या घरात स्वत:ला वेगळे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्रिटीश सरकार कोरोना व्हायरसच्या संक्रमणावर तातडीने काम करत आहे. सर्व सुरक्षा उपायांचा वापर करण्यात येत आहे. पण देशाच्या आरोग्यमंत्र्यालाच कोरोनाची लागण होणे, तपासाचा विषय ठरत आहे. याबाबत आरोग्य विभागाकडून अधिक तपास सुरु आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आरोग्य मंत्र्यांना भेटलेल्या लोकांचा ब्रिटनच्या आरोग्य विभागाकडून तपास सुरु आहे. आतापर्यंत ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची ३८२ प्रकरणे समोर आली आहेत. त्यापैकी ६ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

Leave a Comment