द.आफ्रिकेची टीम सामने खेळणार, हस्तांदोलन नाही करणार


भारत विरुद्ध द. आफ्रिका यांच्यात भारतात होत असलेल्या तीन वनडे सामन्यांसाठी द. आफ्रिकेची टीम दाखल झाली असून या दोन्ही टीम मधला पहिला सामना धरमशाला येथे होत आहे. भारतात करोनाचे रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर द. आफ्रिकेचे कोच मार्क बाउचर यांनी आमचे खेळाडू टीम इंडियाच्या खेळाडूंबरोबर तसेच अन्य समर्थकांबरोबर हस्तांदोलन करणार नाहीत असे स्पष्ट केले आहे.

मार्क म्हणाले, आमच्या खेळाडूंच्या आरोग्याला आमचे सर्वात पहिले प्राधान्य राहील. आमच्यासोबत सुरक्षा स्टाफ आहे तसेच वैद्यकीय पथकही आहे. करोनाचा प्रसार हस्तांदोलन करण्यातून होऊ शकतो हे लक्षात घेऊन आम्ही हा निर्णय घेतला आहे. कदाचित आमच्या कुणा खेळाडूला संसर्ग झालाच तर त्याच्यापासून दुसऱ्या कुणाला तो होऊ नये यासाठीही ही खबरदारी आवश्यक आहे असे आम्हाला सांगितले गेले आहे. विशेष म्हणजे इंग्लंडची टीम श्रीलंका दौऱ्यावर गेली तेव्हा त्यानीही हस्तांदोलन न करण्याचा निर्णय घेतला होता.

द. आफ्रिकेचा संघ यापूर्वी सप्टेंबर २०१९ मध्ये भारतात आला होता तेव्हा ३ टी२० व तीन कसोटी अश्या दोन मालिका खेळल्या गेल्या होत्या. यावेळी मात्र फक्त वन डे सिरीज खेळली जाणार आहे.

Leave a Comment