गर्भधारणा होण्यासाठी महिलांनी आहारामध्ये आणि जीवनशैलीमध्ये करावेत काही बदल


प्रजनेन्द्रीयांचे कार्य सुरळीत चालू असणारी कोणतीही महिला गर्भाधारणेस सक्षम असते. पण काही महिलांना गर्भधारणा सहजासहजी होत नाही. अश्या महिलांनी आपल्या आहारामध्ये आणि आपल्या जीवनशैलीमध्ये काही परिवर्तने केल्यास ही समस्या दूर होऊ शकते. त्याकरिता काही साध्या उपायांचा अवलंब करायला हवा.

महिलेचा आहार योग्य आणि संतुलित असेल, तर तिचे आरोग्य चांगले राहते. हा आहार जीवनसत्वे, प्रथिने आणि इतर पोषक घटकांनी युक्त असायला हवा. गर्भधारणा होण्यासाठी शरीरामध्ये क जीवनसत्व असणे अतिशय आवश्यक असते. तसेच प्रजननक्षमता सुधारण्यासाठी प्रथिने गरजेची असतात. त्यामुळे महिलांनी आपल्या आहारामध्ये ताज्या भाज्या, फळे, डाळी, कडधान्ये इत्यादींचा समावेश करायला हवा. तसेच खाण्या-पिण्याच्या वेळा नियमित सांभाळायला हव्यात.

गर्भाधारणेसाठी जसा आहार नियंत्रित हवा, त्याचप्रमाणे शरीराला व्यायाम मिळणेही आवश्यक आहे. या काळा दरम्यान जलद चालण्याचा व्यायाम सर्वोत्तम समजला जातो. हा एक उत्तम कार्डियो व्हॅस्क्युलर व्यायाम असून, यामुळे पाठ, पाय, पोटाचे स्नायू बळकट होण्यास मदत होते. त्यामुळे सकाळी किंवा संध्याकाळी, आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी दोन्ही वेळी चालण्यास जावे.

दिवसभराच्या धकाधकीपासून लांब, स्वतःसाठी वेळ देणे गरजेचे आहे. या करिता आपल्या सगळ्या चिंता, विवंचना बाजूला ठेऊन काही वेळ मन एकाग्र करून आपल्या श्वासोच्छ्वासावर ध्यान एकाग्र करावे. या मुळे मनाला आणि शरीरला आवश्यक ती विश्रांती मिळते. या काळामध्ये मन शांत करणारे संगीत ऐकावे. त्यामुळे मनावरील तणाव दूर होण्यास मदत मिळते. तसेच रात्री झोपण्याआधी आर्धा तास आपला मोबाईल फोन, टीव्ही इत्यादी बंद करून टाकावेत.

गर्भधारणा होण्यासाठी एक ठराविक वय योग्य समजले जाते. विशीमध्ये महिलांची प्रजननक्षमता सर्वाधिक असून, तिशीनंतर ही क्षमता कमी होण्य्स सुरुवात होते. त्यामुळे गर्भधारणेचा निर्णय घेताना वयाचा विचार करणे देखील अगत्याचे आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment