कोरोनामुळे श्रीमंतांच्या यादीतील पहिले स्थान मुकेश अंबानींनी गमावले


नवी दिल्ली – रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्यावरही कोरोनामुळे शेअर बाजारात आलेल्या मंदीचा परिणाम झाला आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान त्यांना सोसावे लागले आहे. तब्बल ४४ हजार कोटी रूपयांची मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत घट झाली आहे. फोर्ब्सच्या रिअल टाईमनुसार मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत ११.६८ टक्क्यांची घट झाली असून ती आता ४२.२ अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. मुकेश अंबानींना एका दिवसात ५.६ अब्ज डॉलर्सचे नुकसान सोसावे लागल्यामुळे मुकेश अंबानींना आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील पहिले स्थान गमवावे लागले आहे.

कच्च्या तेलाच्या किंमतीत सोमवारी मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यानंतर रिलायन्सच्या शेअर्समध्येही घसरण झाल्याचे चित्र पहायला मिळाले. कच्च्या तेलावरून सौदी अरेबिया आणि रशियादरम्यान दरयुद्ध सुरू आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीवर त्याचा परिणाम झाला असून कच्च्या तेलाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ३१ टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरात १९९१ नंतर झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजवरही कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली घसरण परिणाम करेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर कच्च्या तेलाच्या किंमतीचा परिणाम त्याच्या जीआरएमवर होईल. रिलायन्स इंडस्ट्रीजचा जीआरएम डिसेंबर तिमाहीत ९.२ डॉलर प्रति बॅरल होता. रिलायन्सच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीनंतर रिलायन्सचे बाजार मूल्य ७ लाख ५ हजार ६५५.५६ कोटी रूपयांवर आले आहे.

Leave a Comment