राज्यातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना ‘ड्रेसकोड’ अनिवार्य


मुंबई : हातगाड्यांवर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या राज्यातील सर्व विक्रेत्यांना यापुढे ड्रेसकोड लागू करण्यात येणार असून ही मोहीम अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या पुढाकारातून हाती घेण्यात आली आहे. बुलडाण्यातून याची सुरुवात करण्यात आली आहे.

शिंगणे यांनी त्या पार्श्वभूमीवर चिंचोले चौकातील हातगाडीवर पाणीपुरी, पाव-भाजी, भेळ, चायनीज, आईस्क्रीम इत्यादी खाद्यपदार्थ विक्रेत्यांना नव्या ड्रेसकोडचे वाटप केले आहे. यात अॅप्रॉन, हँडग्लोज आणि कॅपचा समावेश आहे. तसेच या विक्रेत्यांच्या हाताची, नखांची स्वच्छता आहे की नाही याचीही स्वच्छतेच्या दृष्टीने तपासणी करण्यात येत आहे. त्याशिवाय विक्रेत्यांचे परवानेही तपासले जात आहेत.

स्वच्छ आणि शुद्ध खाद्यपदार्थ राज्यातील सर्व खवय्यांना मिळावे यासाठी चांगल्या आणि स्वच्छ वातावरणात हातगाडीवर खाद्यपदार्थांची विक्री करावी. त्यासाठी यापुढे अन्न आणि औषध प्रशासनातर्फे राज्यभर हातगाड्या तपासण्याची मोहीम राबवली जाणार आहे.

तसेच कुठलाही त्वचा रोग या विक्रेत्यांना आहे का, त्याचीही आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे यापुढे खाद्य पदार्थ ग्राहकांना देताना हँडग्लोजचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. यापुढे याचा वापर न करणाऱ्या विक्रेत्यांवर एक रुपयांपासून ते एक लाख रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

Leave a Comment